Join us  

वास्तववादी कथानकावर आधारित ‘रेती’

By admin | Published: April 06, 2016 1:42 AM

मराठी चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट येत आहेत. मात्र, वास्तववादी कथानक आणि सामाजिक बांधिलकीची भावना जपणाऱ्या ‘रेती’ चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली

मराठी चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट येत आहेत. मात्र, वास्तववादी कथानक आणि सामाजिक बांधिलकीची भावना जपणाऱ्या ‘रेती’ चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे हे सगळे जपताना मनोरंजन कोठेही कमी होणार नाही याची काळजी घेतली आहे. किशोर कदम यांची वाळूमाफियाची आणि संजय खापरे यांची पर्यावरणवादी कार्यकर्त्यांची दमदार भूमिका हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे. ‘लोकमत सीएनएक्स’शी बोलताना किशोर कदम म्हणाले, ‘‘संपूर्ण महाराष्ट्रात बेकायदा आणि अनिर्बंध सुरु असलेला वाळू उपसा आणि मनगटशाहीच्या जोरावर हा धंदा करणाऱ्यांच्या मागचे राजकारण्यांचे छुपे हात हे अता उघड गुपित आहे. ‘रेती’च्या माध्यमातून या बेलगाम धंद्याचा काळा पट, दमदार कथा माध्यमातून विणला आहे. त्यातील क्षणाक्षणाचे संघर्ष नाट्य प्रेक्षंकापुढे मांडण्यात आले आहे. मी किसन या वाळूमाफियाच्या भूमिकेत दिसणार आहे. वाळूमाफिया हा काय असतो, त्याच्या विरुध्द लोकांनी कशी पावले उचलली पाहिजे, स्वच्छ पाण्यासाठी नदीमध्ये वाळू तर पाहिजेना, घर बांधायचे असेल त्यासाठी वाळू कोठून आणायची अशा अनेक प्रश्नांचे चित्रण या चित्रपटामध्ये करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात होणारे शहरीकरण, मोठ-मोठ्या प्रमाणात उभारण्यात येणाऱ्या इमारती, रस्ते, धरणे यासाठी मोठ्या प्रमाणात रेतीचा वापर केला जातो. ही रेती बांधकामापर्यंत कशी येते यामागे नक्की कोणत्या पद्धतीचे राजकारण केले जाते. भ्रष्ट सरकारी अधिकारी, पोलिस आणि राजकारण्यांची साखळी यावर प्रकाशझोत या चित्रपटामधून टाकण्यात आलेला आहे. वाळूची मोठ्या प्रमाणात होणारी लूट, ती लूट कशाप्रकारे होते यामध्ये काय काय केले जाते याची सामान्य माणसाला कल्पना नसते. त्यामुळे हा चित्रपट एका वेगळ््याच विषयावरती भाष्य करतो, असे किशोर कदम म्हणाले.संजय खापरे म्हणाले, मी वाळूमाफियांच्या विरोधात आवाज उठविणाऱ्या सदानंद भामरे या व्यक्तिरेखेच्या भूमिकेत दिसणार आहे. नामपूर येथील मोसम नदीची अवस्था वाळू उपसल्यामुळे खूप भयानक झाली आहे. नदीला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी तो कोणकोणते प्रयत्न करतो आणि त्याला कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते हे या चित्रपटामधून पहायला मिळणार आहे. पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत, नुसती घरे त्यासाठी गावात पाणी तर पाहिजे ना ? मग त्यासाठी ज्या ठिकाणी पाणी नाही तिथे पाणी कसे आणता येईल यासाठी कोणत्या उपाययोजना राबविल्या पाहिजेत, पण जिथे पाणी आहे, त्यांचे जतन कसे केले पाहिजे, यासाठी कोणते प्रयत्न करणे गरजेचे आहे, असा सोशल मेसेज प्लस एंटरटेन्मेंट करणारा हा चित्रपट आहे. त्यामुळे हा चित्रपट करताना खूप मजा आली, सुहास भोसले दिग्दर्शीत असलेला वेगळा आशयाचा सिनेमा असल्यामुळे तसेच स्टार कास्ट ही चांगली असल्याने हा चित्रपट करण्याची मोठी संधी मला मिळाली. कथा, पटकथा आणि संवादलेखक देवेन कापडनीस यांची असून सुहास भोसले यांचे दिग्दर्शन आहे. संजय कृष्णाजी पाटील यांच्या गीतांना प्रसिध्द गायक शानने संगीत दिले आहे. प्रमोद गोरे निर्माते आहेत. हा चित्रपट गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर म्हणजेच येत्या ८ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.