मुंबई – बॉलिवूडचे दिग्गज संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांचं बुधवारी सकाळी निधन झालं आहे. मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. बप्पी लहरी यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५२ मध्ये झाला होता. बॉलिवूडमध्ये ७० च्या दशकात डिस्को आणि रॉक म्युझिकच्या माध्यमातून बप्पी लहरी यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली होती. अंगावर घातलेल्या सोन्याच्या दागिन्यांमुळेही बप्पी लहरी यांची क्रेझ होती.
बप्पी लहरी यांनी त्यांच्या कारकिर्दीत बॉलिवूडमध्ये अनेक हिट गाणी गायली. रिएलिटी शो मध्ये जज म्हणूनही त्यांनी भूमिका निभावली होती. शरीरावर प्रचंड सोनं, गळ्यात चेन, हातात अंगठ्या अशी त्यांची प्रतिमा होती. अमेरिकन रॉकस्टार एल्विस प्रेस्लीपासून त्यांना अंगावर सोने घालण्याची प्रेरणा मिळाली. २०१४ च्या निवडणुकीत बप्पी लहरी यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सन २०१४ मध्ये त्यांच्याकडे ७५४ ग्रॅम सोनं आणि ४.६२ किलो चांदी होती.