Join us  

‘बजरंगी भाईजान’ने केले १०० कोटी पार

By admin | Published: July 21, 2015 3:48 AM

सलमान खानची निर्मिती असलेल्या व रमजान ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘बजरंगी भाईजान’ने अवघ्या तीन दिवसांतच १०२ कोटी रुपयांची कमाई केली आहे

सलमान खानची निर्मिती असलेल्या व रमजान ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘बजरंगी भाईजान’ने अवघ्या तीन दिवसांतच १०२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. सलमान खान नायक असलेल्या या चित्रपटाकडून या यशाची अपेक्षा होती व त्यानुसार १०० कोटी रुपयांच्या क्लबमध्ये तो दाखलही झाला. १७ जुलै रोजी ‘बजरंगी भाईजान’ प्रदर्शित झाला व त्याच दिवशी त्याने २७ कोटी रुपयांची कमाई करून खूपच जोरदार सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी ईद होती व त्या दिवशीही त्याच्या कमाईचा आलेख उसळला व त्याने ३६ कोटींपेक्षाही जास्त गल्ला जमवला. उत्तम कमाईचा त्याचा वेग तिसऱ्या म्हणजे रविवारीही तसाच राहिला व त्याने ३८ कोटींची कमाई केली. या गतीने त्याने पहिल्या तीन दिवसांतच १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करून ‘बजरंगी’चा डंका वाजवला. दोन चांगल्या गोष्टी या चित्रपटाबद्दल झाल्या. एक म्हणजे सोमवारीही प्रेक्षकांच्या चित्रपटासाठी रांगा लागल्या होत्या व दुसरी म्हणजे चित्रपट बघणारा प्रत्येक जण त्याचे कौतुक करीत होता. विशेषत: भारत आणि पाकिस्तानच्या सामान्य नागरिकांसाठी त्याद्वारे देण्यात आलेल्या प्रेम आणि सौहार्दाच्या संदेशाचे सगळ्यांना महत्त्व वाटत आहे.‘बजरंगी भाईजान’मधील सलमानच्या नव्या अवतारावरही प्रेक्षक खूश आहेत. ‘वाँटेड’पासून ‘किक’पर्यंतच्या चित्रपटांत मनोरंजनाच्या नावाखाली हाणामाऱ्या (अ‍ॅक्शन्स) करणारा सलमान ‘बजरंगी भाईजान’मध्ये पूर्णपणे नव्या स्वरूपात आहे. यातील त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे डोळेही पाणावतात. सलमानशिवाय पाकिस्तानात आपले कुटुंबीय व मातृभूमीपासून दुरावून भारतात आलेली मुन्नी ऊर्फ शाहिदा साकारणाऱ्या हर्षाली मल्होत्रानेही प्रेक्षकांची मने जिंकली. बॉलीवूडमधील चित्रपटांचे जाणकार म्हणतात की, ‘बजरंगी भाईजान’ने त्याच्याकडून असलेल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत व त्याचे भवितव्यही सुखद आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून संपणाऱ्या पहिल्या आठवड्यात हा चित्रपट १५० कोटी रुपयांचा आकडा ओलांडून जाऊ शकतो, असा जाणकारांचा होरा आहे. ‘बाहुबली’मुळे दक्षिण भारतात आणि एवढेच काय हिंदी पट्ट्यातही ‘बजरंगी भाईजान’ला कमी चित्रपटगृहे मिळाली अन्यथा त्याची कमाई यापेक्षाही चांगली असती, असे जाणकारांचे म्हणणे आहे.याआधी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांबद्दल सांगायचे तर याक्षणी बॉक्स आॅफिसवर फक्त ‘बजरंगी भाईजान’च्याच जादूचा प्रभाव आहे. इतर चित्रपट खूपच मागे पडले आहेत. ‘बाहुबली’चा विचार करायचा तर अनेक भाषांत एकाच वेळी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या ९ दिवसांत ३०० कोटी रुपयांचा गल्ला जमवून आपल्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला. असे करणारा हा भारतातील पहिला चित्रपट ठरला. येत्या शुक्रवारी कोणताही नवा चित्रपट प्रदर्शित होणार नसल्यामुळे त्याचा थेट लाभ ‘बजरंगी भाईजान’लाच होणार आहे. यापुढे प्रदर्शित होणारा चित्रपट ‘मसान’ असेल. त्यात प्रमुख भूमिकेत ऋचा चड्डा असून या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवर वाहवा मिळविली आहे. शिवाय पुरस्कार मिळविल्यामुळे त्याची चर्चाही आहे. परंतु बॉक्स आॅफिसचा विचार केला तर त्याच्याकडून अपेक्षा ठेवणे योग्य होणार नाही.