Join us  

सुभाष घईंनी ‘सा रे ग म प’च्या स्पर्धकाला दिला कोरा चेक आणि कॉन्ट्रॅक्ट,वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 5:30 PM

Sa Re Ga Ma Pa शोच्या या भागात अंतिम 10 स्पर्धकांनी आपल्या अप्रतिम आवाजात बहारदार गाणी सादर केली असली, तरी सुभाष घई यांनी या भागात केलेल्या टिप्पणीमुळे प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्काच बसला.

छोट्या पडद्यावर सर्वाधिक काळ सुरू असलेला रिएलिटी शो ‘सा रे ग म प 2021’ची नवा सिझन चांगलाच गाजत आहे. येत्या शनिवारच्या भागात प्रेक्षकांना एक पर्वणी पाहायला मिळणार असून नामवंत निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई हे विशेष अतिथी म्हणून यात सहभागी होणार आहेत.या भागात अंतिम 10 स्पर्धकांनी आपल्या अप्रतिम आवाजात बहारदार गाणी सादर केली असली, तरी सुभाष घई यांनी या भागात केलेल्या टिप्पणीमुळे प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्काच बसला. स्पर्धेतील गुणी आणि तरूण स्पर्धकांना उत्कृष्टपणे गाताना पाहून घई यांना त्यांच्याबरोबर काम केलेल्या काही पार्श्वगायकांची आठवण आली. यावेळी घई यांनी काही रंजक किस्से कथन केले. इतकेच नव्हे, तर दीपायन आणि नीलांजना यांची तुलना त्यांनी किशोरकुमार आणि लता मंगेशकर यांच्याशी केली. त्यापैकी एकाला घई यांनी जीवनात एकदाच मिळणारी ऑफर दिली.

 

या विशेष भागात नीलांजनाने लता मंगेशकर यांचे ‘ओ रामजी, बडा दु:ख दीना’  हे गीत अफलातून पध्दतीने गायले. तिच्या सुरेल आवाजाने घई मंत्रमुग्ध झाले आणि त्यांनी तिला एक कॉन्ट्रॅक्टच देऊ केले.‘सा रे ग म प’च्या या भागात सुभाष घई म्हणाले, “नीलांजना, तू फारच सुरेख पध्दतीने गायलीस. मला तर असं वाटतंय की तू हे गाणं जगलीस. तुझं गाणं आणि आवाज इतका सुंदर होता की मला क्षणभर लताजीच हे गाणं गात आहेत, असं वाटलं. मी तुला विनंती करतो की तू आमच्या ऑफिसमध्ये ये, कारण तिथे एक कॉन्ट्रॅक्ट तुझी वाट पाहात असेल.”

 

या ऑफरमुळे नीलांजना फारच खुश झाली, तसेच दीपयानचीही त्यांनी मुक्त कंठाने प्रशंसा केली. दीपायनने जबरदस्त गायलेले ‘ओम शांती ओम’  हे गाणे ऐकून सुभाष घई जुन्या आठवणींमध्ये रमले आणि त्यांनी किशोरकुमार यांनी केलेल्या या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळची आठवण सांगितली. सुभाष घई म्हणाले, “किशोरदांनी हे गाणं जशा बारकाईने गायलं आहे, अगदी तसंच तू सुध्दा गायलास. दीपायन, तू फारच उत्कृष्टपणे हे गाणं गायलास आणि ते ऐकताना मला असं वाटलं की किशोरदाच परत आले आहेत. फारच अप्रतिम कामगिरी” दीपायन ही स्तुती ऐकून आनंदित झाला, पण इतक्यानेच झाले नव्हते.

 स्निग्धजितने ‘खलनायक’ हे गाणे सुंदरपणे गायल्यावर एक किस्सा सांगितला. आपण हे गाणे गायल्यानंतर आपल्याला एका पबमध्ये गायकाची नोकरी मिळाल्याचे स्निग्धजितने सांगितले. अशा उत्तम चित्रपटांची निर्मिती केल्याबद्दल त्याने घई यांचे आभारही मानले. पण पुढे काय होणार आहे, याची त्यालाही कल्पना नव्हती. त्याच्या सुरेल आवाजाने मंत्रमुग्ध झालेल्या घई यांनी एका कोर्‍या  चेकवर स्वाक्षरी केली आणि तो स्निग्धजितला देऊन सांगितले, “स्निग्धजित, तुला माझे आशीर्वाद आहेत. कोणत्याही गायकासाठी प्रारंभाचा संघर्षाचा काळ महत्त्वाचा असतो, हे मला ठाऊक आहे आणि आज या ठिकाणी पोहोचण्यासाठी इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने असाच संघर्ष केला आहे, हेही मी जाणतो. तुझं गाणं ऐकून मी खूप प्रभावित झालो असून मला तुला एक चेक द्यायचा आहे. मी त्यावर कोणतीही रक्कम घातलेली नाही. तू तुला हवी ती रक्कम त्यावर लिही.”

 

सुभाष घई यांनी केलेली प्रशंसा आणि त्यांनी दाखविलेल्या औदार्यामुळे तुम्ही चकित झाला असाल, पण  तोपर्यंत तुम्ही ‘सा रे ग म प 2021’च्या येत्या शनिवारच्या भागातील स्पर्धकांनी सादर केलेली गाणी ऐका. ती ऐकल्यावर तुम्ही भारावून जाल.

टॅग्स :सुभाष घई