स्वातंत्र्यदिन म्हटला, की प्रत्येकाच्या शाळा, महाविद्यालयातील आठवणी जाग्या होतात. तो नवा कोरा गणवेश, त्या दोन वेण्या, शाळेत मिळणारा खाऊ... या गोष्टींतून मिळणारा आनंद काही वेगळाच होता. हाच आनंद, या आठवणी मराठी कलाकारांनी लोकमत सीएनएक्ससोबत शेअर केल्या. >प्रिया मराठे : मी एसवायमध्ये शिकत होते. त्या वेळी १५ आॅगस्टच्या दिवशी ब्लड डोनेशनचे आयोजन केले होते. मीदेखील या दिवशी पहिल्यांदा ब्लड डोनेट केले. त्या ब्लड डोनेशनबद्दल मला सर्टिफिकेटदेखील मिळाले होते. पण ते घेण्यासाठी मी पुढे स्टेजवर गेले आणि चक्कर येऊन खाली पडले. तो १५ आॅगस्ट मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. या दिवसाच्यानिमित्ताने मला लोकांना एक आग्रहाची विनंती करायची आहे. स्वातंत्र्यदिनाला तिरंगा विकत घेऊन अनेक जण नंतर तो फेकून देतात. कृपया तिरंगा रस्त्यावर फेकून त्याचा अपमान करू नका. >सायली संजीव : दरवर्षी स्वातंत्र्यदिन मला शाळेच्या आठवणीत घेऊन जातो. या दिवशी आमच्या शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. मला डान्सची आवड असल्यामुळे मी पहिली ते दहावीपर्यंत डान्समध्ये सहभाग घेतला आहे. त्यामुळे या दिवशीचा उत्साहच वेगळा असायचा. आपले घर आपण स्वच्छ ठेवतो, त्याप्रमाणेच आपला देशदेखील स्वच्छ ठेवा, ट्रॅफिकचे नियम पाळा आणि आपल्या देशाला अभिमान वाटेल, असे काम करा, असे मी लोकांना या दिवसाच्यानिमित्ताने सांगेन. >पल्लवी पाटील : माझ्यासाठी १५ आॅगस्टचे दिवस हे अविस्मरणीय आहेत. कारण शाळेत असताना मी बँड पथकामध्ये होते. त्यामुळे माझ्यासाठी हा दिवस खास असायचा. तो कडक युनिफॉर्म आजही मला आकर्षित करतो. आपले देशप्रेम हे फक्त स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनीच उफाळून येते. पण देशाविषयी आपले असलेले प्रेम आपण आपल्या कृत्यातून दाखवावे, असे मला वाटते. एक जबाबदार नागरिक म्हणून रस्त्यावर कचरा टाकू नये, सिग्नल तोडू नये.>ललित प्रभाकर : मी शाळेत असताना हॉस्टेलमध्ये राहत होतो. त्यामुळे १४ आॅगस्टपासून शाळेतील सर्व गोष्टींची तयारी आमच्या ग्रुपला करावी लागत असे. पण त्यामध्ये पण खूप मजा यायची, रात्रभर जागून आम्ही शाळेची सजावट करायचो. १५ आॅगस्टचा दिवस उजाडला, की या सर्व आठवणी पुन्हा जाग्या होतात. आपण देवाला जितके महत्त्व देतो, तितकेच महत्त्व देशालादेखील दिले पाहिजे. प्रत्येकाला आपल्या देशाबद्दल प्रेम, आस्था असलीच पाहिजे, असे मला वाटते. >संग्राम साळवी : देशासाठी जे लढले आहेत, त्या शूरवीरांचा खरंच मला खूप अभिमान वाटतो. शाळेत या दिवशी मिळणाऱ्या खाऊचा आनंद काही वेगळाच असायचा. स्वातंत्र्यदिनाला माझ्या फॅन्सना मला एकच गोष्ट सांगायची आहे, गरिबाला मदत करण्याच्या उद्देशाने दोन रुपयांचा झेंडा तुम्ही खरेदी केला असेल तर तो एक जबाबदार नागरिक म्हणून नक्कीच सांभाळा.
आठवणीतील १५ आॅगस्ट
By admin | Updated: August 15, 2016 03:35 IST