Join us

आशाजींच्या सूरांनी सजले ‘बेगम जान’चे गाणे!

By admin | Updated: March 26, 2017 03:56 IST

विद्या बालनच्या ‘बेगम जान’ या चित्रपटाची लोक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.

विद्या बालनच्या ‘बेगम जान’ या चित्रपटाची लोक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. या चित्रपटातील पहिले गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले. ‘प्रेम में तोहरे...’ असे बोल असलेल्या या गाण्यातील आवाज मंत्रमुग्ध करणारा आहे. होय, कारण बॉलिवूडच्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी या गाण्याला शब्दसूरांचा साज चढवला आहे. गेली अनेक वर्षे आपल्या आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आशा भोसले यांच्या आवाजातील हे गाणे ऐकणे म्हणजे एक अनोखी पर्वणीच आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आशा भोसले यांनी २०१३मध्ये चित्रपटासाठी शेवटचे गाणे गायले होते. त्यानंतर जवळपास चार वर्षांनी ‘बेगम जान’च्या निमित्ताने चित्रपटामध्ये त्यांचा सुरेल आवाज आपल्याला ऐकायला मिळाला आहे. प्रेम आणि वेदना यावर आधारित हे गाणे असून या गाण्याचे गीतकार कौसर मुनीर आहेत तर या गाण्याला संगीत दिले आहे अनु मलिक यांनी. आशा भोसले यांच्यासोबत काम करण्याबद्दल अनू मलिक यांनी सांगितले की, माझी प्रकृती ठीक नव्हती म्हणून आशा भोसले मला भेटण्यासाठी आल्या होत्या. त्याच वेळी मला त्यांच्यासोबत काम करायचेच आहे, असे मी माझ्या पत्नीसमोर जाहीर केले होते. यानंतर मी आशाजींना फोन करून माझ्या घरी येण्याचे निमंत्रण दिले. ही धून आशाजींना खूप आवडली आणि ही धून म्हणजे आशा भोसलेंचे पुनर्पदार्पण असेल, असे त्या म्हणाल्या आणि त्यांनी हे गाणे गायलेदेखील.