मराठी सिनेमातील संगीतात अनेक प्रयोग घडत आहेत. युवा संगीत दिग्दर्शकांची फळी तरुणाईला भावतील, अशा सुरेल गीतांची निर्मिती करीत आहेत. बॉलिवूडमधील अनेक गायक मराठी सिनेमांत गाण्यासाठी उत्सुक असलेले पाहायला मिळतात. याच धर्तीवर रेड बेरी एन्टरटेन्मेंट प्रस्तुत श्री सदिच्छा फिल्म्स निर्मित ‘कौल मनाचा’ या मराठी सिनेमात बॉलिवूडमधील आघाडीचे गायक अरमान मलिक आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजातील झक्कास प्रेमगीत ऐकायला मिळणार आहे. या चित्रपटाची निर्मिती राजेश सुकलाल पाटील, विठ्ठल हनुमंत रूपनवर, नरशी वासानी यांनी केली असून, सहनिर्मिती निकिता राजेश पाटील यांची आहे. मन मंजिरी तू असे बोल असणारे हे तरल स्वप्नपंखी प्रेमगीत प्रेक्षकांच्या निश्चितच पसंतीस उतरेल असे वाटते. ग्लॅमरस अभिनेत्री अमृता पत्की, अभिनेता राजेश शृंगारपुरे आणि बालकलाकार आशुतोष गायकवाड याच्यावर ते चित्रीत करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा कल जाणून घेत त्यांच्याशी उत्तम समन्वय साधणाऱ्या शिक्षिकेची ही भूमिका अमृता पत्कीने यात साकारली आहे. अमृतासोबत प्रेमगीतात स्क्रीन शेअर करण्याची संधी प्रथमच आशुतोष गायकवाडला मिळाली आहे. भीमराव मुंडे दिग्दर्शित कौल मनाचा या सिनेमात अमृता पत्की, राजेश शृंगारपुरे यांच्यासह समीर धर्माधिकारी, मिलिंद गुणाजी, विजय चव्हाण, जयवंत वाडकर, विजय गोखले, वर्षा दांदळे, कमलेश सावंत, श्वेता पेंडसे, आशुतोष गायकवाड, गिरिजा प्रभू, निनाद तांबडे, गणेश सोनावणे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. येत्या २१ आॅक्टोबरला ‘कौल मनाचा’ चित्रपट प्रदर्शित होतोय.
अरमान - श्रेयाच्या आवाजातील मन मंजिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2016 07:11 IST