Join us

शिस्त आणि वक्तशीरपणा जपणारे अण्णा

By admin | Updated: August 12, 2015 04:48 IST

भालचंद्र पेंढारकर यांना नाट्यक्षेत्रात ‘अण्णा पेंढारकर’ या आदरार्थी नावाने संबोधले जायचे. अण्णांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची शिस्त आणि वक्तशीरपणा! ‘ललितकलादर्श’च्या प्रत्येक

भालचंद्र पेंढारकर यांना नाट्यक्षेत्रात ‘अण्णा पेंढारकर’ या आदरार्थी नावाने संबोधले जायचे. अण्णांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची शिस्त आणि वक्तशीरपणा! ‘ललितकलादर्श’च्या प्रत्येक नाटकाचा पडदा ठरलेल्या वेळी अचूक वर जायचाच. ही शिस्त किंवा प्रघात त्यांनी व त्यांच्या संस्थेने कधीही मोडला नाही. मराठी रंगभूमीवरील ही एक महत्त्वाची घटना आहे. मुळात अण्णांना नाट्यसेवेचे बाळकडू त्यांच्या वडिलांकडूनच मिळाले. केशवराव भोसले यांनी १९०८ मध्ये स्थापन केलेल्या ललितकलादर्श या संस्थेची सूत्रे त्यांच्यानंतर अण्णांचे वडील बापूराव यांच्याकडे आली आणि त्याच वेळी अण्णांचा जन्म झाला. वास्तविक अण्णांना नाटकाचे वेड नव्हतेच; परंतु १९३७ मध्ये बापूरावांचे निधन झाल्यावर संस्थेची जबाबदारी अण्णांवर येऊन पडली. १९४२ मध्ये अण्णांनी ‘ललितकलादर्श’ची पुन्हा मुहूर्तमेढ रोवली आणि त्यानंतर या संस्थेने रसिकमान्य नाट्यकृतींचा रंगभूमीवर सडा पाडला. ‘होनाजी बाळा’ हे याच मांदियाळीतले नाटक प्रचंड गाजले. यातल्या अण्णांनी रंगवलेल्या ‘बाळा’च्या भूमिकेने रसिकांच्या मनावर गारुड केले. १९५७ मध्ये अण्णांनी ‘दुरितांचे तिमिर जावो’ हे नाटक रंगभूमीवर आणले आणि अण्णा रसिकांच्या थेट हृदयसिंहासनावर विराजमान झाले. यातला त्यांनी रंगवलेला ‘दिगू’ प्रचंड लोकप्रिय झाला. यानंतर ‘ललितकलादर्श’चा अश्व सुसाट सुटला आणि संगीत नाटके घेऊन अण्णांनी भारतभर दौरा केला. ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘जय जय गौरीशंकर’ अशा त्यांच्या अनेक नाटकांनी नाट्यगृहावर हाऊसफुल्लचे फलक झळकावले. चित्रपती व्ही. शांताराम यांच्या ‘अमर भूपाळी’ या चित्रपटातही अण्णांनी बाळाची भूमिका रंगवली आणि गाजवली. रंगभूमीवरील संगीतनट या माध्यमातून त्यांनी रसिकांच्या हृदयात कायमचे घर केले. ‘दुरितांचे तिमिर जावो’ या नाटकातील ‘आई तुझी आठवण’, ‘पडछाया’मधील ‘सहया हयो’, ‘पंडितराज जगन्नाथ’मधील ‘मदनाची मंजिरी’ व ‘नयन तुझे जादूगार’, ‘स्वामिनी’मधील ‘विधीयोजना न कळे कुणा’ या व अशा त्यांनी गायलेल्या अनेकविध नाट्यपदांनी रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांची नाट्यसेवेबद्दलची निष्ठा ढळली नाही. अलीकडच्या काळात त्यांनी मुंबई मराठी साहित्य संघातील रेकॉर्डिंग रूममध्ये मराठी संगीत नाटकांच्या मूळ नटसंचातील ध्वनिमुद्रण व ध्वनिफितींचा संग्रह करण्याचे व्रत घेतले होते आणि यातून संगीत रंगभूमीचा दस्तावेज ठरू शकेल, असे हे कार्य त्यांनी अखेरपर्यंत तडीस नेत रंगभूमीविषयीची निष्ठा कायम राखली होती. गाजलेली नाटके : स्वामिनी, दुरितांचे तिमिर जावो, पंडितराज जगन्नाथ, जय जय गौरीशंकर, मंदारमाला, बावन्नखणी, होनाजी बाळा, गीता गाती ज्ञानेश्वर, सं. शारदा, सं. सौभद्र, आकाशगंगा, सत्तेचे गुलाम, पडछाया, संन्याशाचा संसार, हाच मुलाचा बाप, श्री, कृष्णार्जुन युद्ध, सोन्याचा कळस, वधूपरीक्षा