Join us  

मुलाचं कौतुक करताना अनिल कपूरला कोसळलं रडू

By admin | Published: September 14, 2016 12:37 PM

'मिर्झिया' सिनेमातून अभिनेता हर्षवर्धन कपूर रुपेरी पडद्यावर एंट्री मारतोय.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १४ - 'मिर्झिया' सिनेमातून अभिनेता हर्षवर्धन कपूर रुपेरी पडद्यावर एंट्री मारतोय. या सिनेमाच्या म्युझिक लॉन्चच्या निमित्ताने हर्षवर्धन पहिल्यांदाच मीडियासमोर आला. यावेळी हर्षवर्धनच्या नव्या इनिंगला शुभेच्छा देण्यासाठी सगळं कपूर खानदान आणि अवघं बॉलिवुडच अवतरलं होतं. 
 
कपूर कुटुंबीयांच्या प्रत्येकाच्या चेह-यावर हर्षवर्धनच्या नव्या इनिंगचा आनंद पाहायला मिळत होता. मात्र सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या त्या झक्कास स्टार अभिनेता आणि हर्षवर्धनचे वडिल अनिल कपूरवर. लाडकी लेक सोनमनंतर हर्षवर्धन नवी इनिंग सुरु करत असल्याचा आनंद अनिल कपूर यांच्या चेह-यावर पाहायला मिळत होता. यावेळी अनिल कपूर यांनी झक्कास स्टाईलनं आपल्या लेकाचं कौतुक केलं. 
 
मात्र कौतुक करता करता त्यांच्यातला पिता जागा झाला. आपल्या लाडक्या लेकाचं कौतुक करताना ते थकत नव्हते. अनिल कपूर यांच्या बोलण्यात आपल्या लेकाबद्दलचा अभिमान जाणवत होता. त्याचवेळी या बाप माणसाला गहिवरुन आलं आणि त्यांच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं. आपल्या लेकाबद्दलचा हा अभिमान आणि आनंदाश्रू अनिल कपूर यावेळी काही केल्या लपवू शकले नाहीत. लेकानंही रसिकांचं प्रेम मिळवत अभिनयाच्या प्रांतात नवनवीन शिखरं गाठावीत अशाच काहीशी भावना या पित्याच्या मनात दाटून आल्या असाव्यात.