ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - कृष्णा अभिषेकच्या वैयक्तिक पातळीवर घसरणाऱ्या विनोदाने बॉलिवू़डच्या अजून एका अभिनेत्याला दुखावले आहे. कॉमेडी नाइट्स बचाओ ताजा या कार्यक्रमादरम्यान कृष्णाने केलेल्या वैयक्तिक शेरेबाजीमुळे चिडलेली तनिष्ठा चटर्जी काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमाचा एपिसोड अर्ध्यावरच टाकून निघून गेली होती. आता तर कृष्णाने थेट जॉन अब्राहमशीच पंगा घेतला असून, कृष्णाच्या विनोदामुळे नाराज होत जॉन एपिसोडचे चित्रिकरण अर्ध्यावरच टाकून निघून गेला.
फोर्स - 2 या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी जॉन अब्राहम कॉमेडी नाईट्स बचाओ या कार्यक्रमात आला होता. त्यावेळी सोनाक्षी सिन्हाही सुद्धा त्याच्यासोबत होती. यावेळी विनोद सुरू असतानाच कृष्णाने जॉन आणि सोनाक्षीला आपल्यासोबत डान्स करण्यास सांगितले. मात्र जॉनला हे आवडले नाही. त्याने डान्स करण्यास नकार देत कार्यक्रमातून निघून जाणे पसंत केले.
दरम्यान, "कृष्णाने या घटनेला दुजोरा दिला आहे. मी त्याच्या पाप या चित्रपटावर विनोद केला होता. त्यामुळे जॉन नाराज झाल्याचे मला जाणवले. नंतर तो डान्स करण्यास नकार देत निघून गेला. मी त्याची माफी मागून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तो थांबला नाही," असे कृष्णाने सांगितले.