Join us

जवानांसोबत देशानं उभं राहण्याची ही वेळ - अमिताभ बच्चन

By admin | Updated: October 11, 2016 11:40 IST

आपण सुरक्षित राहोत यासाठी जीवाचं बलिदान देणा-या जवानांसोबत देशानं उभं राहण्याची ही वेळ असल्याची भावना बॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - आपण सुरक्षित राहोत यासाठी जीवाचं बलिदान देणा-या जवानांसोबत देशानं उभं राहण्याची ही वेळ असल्याची भावना बॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली आहे. आपल्या ७४व्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे अमिताभ बच्चन यांनी आपल्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. पुढील वाटचालीबद्दल बोलताना मला यापुढेही काम करत राहायचं आहे, आव्हानात्मक भूमिका साकारायच्या आहेत असं अमिताभ बच्चन यांनी सांगितलं.
 
गेल्या काही दिवसांपासून सीमारेषेवर होत असलेल्या घटनांमुळे लोकांमध्ये प्रचंड आक्रोश आहे. एकात्मता दाखवण्याची ही वेळ आहे असं अमिताभ बोलले आहेत. यावेळी अमिताब बच्चन यांनी पाकिस्तानी कलाकारांच्या वादावर ही त्या विषयावर बोलण्याची वेळ नाही असं सांगत बोलण्यास मात्र नकार दिला. 
 
शत्रुघ्न सिन्हा यांनी राष्ट्रपती बनवण्यासाठी अमिताभ बच्चन यांचं नाव सुचवल्याच्या प्रश्नावर बोलताना मी राष्ट्रपती होणार नाही असं पुन्हा एकदा त्यांनी स्पष्ट करुन टाकलं. शत्रुघ्न सिन्हा विनोद करत असतात, असं होणार नाही असं अमिताभ यांनी सांगितलं.
 
आमीर खानचं कौतुक - 
'ठग' चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच आमीरसोबत काम करणा-या अमिताभ बच्चन यांनी आमीरचं भरभरुन कौतुक केलं. आमीर एक मोठा स्टार आहे, गेली कित्येक वर्ष तो बॉलिवूडवर राज्य करत आहे. त्याच्यासोबत काम करणं एक चांगली संधी असल्याचं अमिताभ बोलले आहेत.
 
केकची प्रथा बंद करायला सांगितलं - 
केक का आणतात मला माहित नाही, बरं आणल्यावर त्यावर मेणबत्ती पेटवायची आणि मग ती फुकायची. त्यानंतर एक चाकू आणला जातो ज्याने तो केक कापायचा. कापून झाल्यावर घरातल्या मोठ्या व्यक्तीला भरवायचा. आणि आता तर एक नवीनच कांड सुरु झाला आहे, ज्यामध्ये संपुर्ण केक तुमच्या तोंडावर फासला जातो. हे सगळं का करतात मला माहित नाही त्यामुळे केकची प्रथा बंद करायला सांगितलं आहे.