Join us  

'शेफ'च्या भूमिकेत झळकणार अक्षय कुमार?

By admin | Published: February 26, 2016 9:44 AM

हॉलिवूडमधील शेफ चित्रपटाचा रिमेक बनत असून अक्षय कुमार त्यात शेफची भूमिका निभावणार असल्याचे वृत्त आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - 'एअरलिफ्ट' चित्रपटाला मिळालेले यश आणि या चित्रपटातील भूमिकेचे सर्वांनी केलेले कौतुक यामुळे 'खिलाडी स्टार' अक्षय कुमारच्या नवीन वर्षाची सुरूवात तर एकदम रॉकिंग झाली आहे. आणि सध्या त्याच्या हातातील प्रोजेक्ट्स पाहता हे संपूर्ण वर्षच त्याच्यासाठी उत्तम जाणार असे दिसते. बँकॉकच्या रेस्टॉरंटमधील शेफ ते बॉलिवूडमधील आघाडीचा नायक हा अक्षयचा प्रवास अतिशय रोमांचक असून येत्या काळात त्याला पुन्हा त्याची शेफची भूमिका जगता येणार आहे. त्यामागचं खरं कारण म्हणजे २०१४ साली हॉलिवूडमध्ये प्रदर्शित झालेल्या 'शेफ'चा बॉलिवूडमध्ये रिमेक बनत असून अक्षय त्यात मुख्य (शेफचीच) भूमिका निभावणार असल्याचे वृत्त आहे. यापूर्वी ही भूमिका अभिनेता सैफ अली खान करणार होता, मात्र काही कारणांमुळे आता हा रोल सैफऐवजी अक्षयच्या पारड्यात पडला आहे. 
२०१४ साली प्रदर्शित झालेल्या 'शेफ' चित्रपटात जॉन फॉव्रेऊ, स्कार्लेट जॉन्सन, सोफिया वर्गेरा आणि रॉबर्ट डॉवनी.ज्युनियर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. लॉस अँजिलिसमधील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये प्रोफेशनल शेफ म्हणून काम करताना कराव्या लागलेल्या तडजोडींना नकार देत शेफ ती नोकरी सोडतो आणि आपला मित्र आणि मुलाच्या मदतीने एक 'फूड ट्रक' उघडतो. हा सर्व प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला असून बॉलिवूडच्या रिमेकमध्ये अक्षय कुमार 'शेफ'चा रोल करेल. स्वत: एक उत्तम कूक असलेल्या अक्षयने सुरूवातीच्या काळात बँकॉकमध्ये शेफ म्हणूनही काम केले होते, त्यामुळे हा अनुभव या चित्रपटासाठी त्याला नक्कीच फायदेशीर ठरेल आणि इतर चित्रपटांमप्रमाणे तो याही चित्रपटात उत्तम काम करेल यात शंका नाही.