Join us  

'चि. व चि. सौ. का'नंतर आता ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोलेची जोडी झळकणार या सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 12:21 PM

Lalit Prabhakar And Mrunmayee Godbole: भारत आणि जपानमध्ये घडणाऱ्या या प्रेमकहाणीमध्ये ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

'प्लॅटून वन फिल्म्स'ने नुकतीच आपल्या नव्याकोऱ्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. 'तो, ती आणि फुजी' असं शीर्षक असणाऱ्या ह्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा मराठीतला प्रयोगशील दिग्दर्शक मोहित टाकळकर सांभाळणार आहे. भारत आणि जपानमध्ये घडणाऱ्या या प्रेमकहाणीमध्ये ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) आणि मृण्मयी गोडबोले (Mrunmayee Godbole) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ललित आणि मृण्मयीची लोकप्रिय जोडी याआधी 'चि. व चि. सौ. का' चित्रपटात बघायला मिळाली होती. त्यानंतर आता ही जोडी  'तो, ती आणि फुजी' चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

चित्रपटाची कथा एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडालेल्या दोन पात्रांभोवती फिरते. पात्रांच्या वैयक्तिक आशा आकांक्षा, त्यांची वेगवेगळी जीवनमुल्यं आणि एकमेकांकडून असलेल्या अवाजवी अपेक्षा ह्यांमुळे त्यांच्या नात्याचा कडवट शेवट होतो. पण पुन्हा सात वर्षांनी ही दोन पात्रं अनपेक्षितपणे एकमेकांसमोर येतात. त्यावेळी त्यांच्यासमोर असतात एकमेकांची वेगळ्या वाटेवरची आयुष्यं आणि त्यामुळे तयार झालेल्या नव्या अडचणी. त्यानंतर काय घडेल, हे चित्रपटात पाहायला मिळेल.

'झिम्मा' या २०२१ मधल्या दुसऱ्या सर्वाधिक कमाई असणाऱ्या सिनेमाची लेखिका इरावती कर्णिकने या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे.  शिलादित्य बोरा आणि राकेश वारे ही जोडी 'तो, ती आणि फुजी' या चित्रपटाची निर्मिती करीत असून, ह्या वर्षाअखेरीस चित्रिकरणाला सुरुवात होणार आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी त्यांना तेलगू अभिनेते आणि निर्माते असलेल्या राकेश वारे यांची साथ मिळाली आहे. 'तो, ती आणि फुजी'चं चित्रिकरण पुणे, कोलाड, टोकियो, क्योटो आणि माउंट फुजी इथे होणार आहे. दोन विभिन्न संस्कृती असणाऱ्या देशांचं सौंदर्य टिपण्यासाठी, या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी दोन वेगळे सिनेमॅटोग्राफर्स असणार आहेत. प्लॅटून वन फिल्म्स' आणि ‘क्रेझी अँट्स प्रॉडक्शन’ निर्मित, 'तो, ती आणि फुजी' हा चित्रपट १७ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रदर्शित होईल.

टॅग्स :ललित प्रभाकर