Join us  

हरपला सोज्वळ चेहरा! सीमा देव अनंतात विलीन, आईला अखेरचा निरोप देताना अभिनय-अजिंक्य भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 7:10 PM

आईला अखेरचा निरोप देताना अजिंक्य देव आणि अभिनय देव झाले भावूक.

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सीमा देव यांचं आज 24 ऑगस्ट रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झालं.. मुलगा दिग्दर्शक अभिनय देव यांच्या वांद्रे येथील घरी आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनयक्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण करणा-या सीमा देव यांना सध्या एका जटील आजाराने ग्रस्त होत्या.

बांद्रा येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन  ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, अभिनेत्री नेहा पेंडसे, पुजा साळुंखे यांनी त्यांचं अंतिम दर्शन घेतलं. सीमा यांच्या पार्थिवावर दादर येथील शिवाजी पार्कमधील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. मोठा मुलगा अभिनय याने आईला खांदा दिला. आईला अखेरचा निरोप देताना  मुलगा अजिंक्य देव भावूक झाला होता. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, अभिनेता भरत जाधव, सुशांत शेलार, जावेद जाफरी, अभिनेत्री चिन्मयी सुमीत हे त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी  शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत हजर होते. 

सीमा देव यांचा मुलगा अजिंक्य देवने दु:ख व्यक्त करत कुटुंबात कधीही न भरणारी पोकळी निर्माण झाल्याची खंत बोलवून दाखवली आहे. आज माझी आई सीमा देव यांचं निधन झालं. सकाळी सात वाजता ती गेली. गेली तीन ते चार वर्ष ती अल्झायमरशी झुंज देत होती. पूर्ण विस्मृती तिला झाली होती. बाबांना जाऊन आता कुठे एक दिड वर्ष झालं होतं”.

सीमा देव यांनी ८० हून जास्त मराठी आणि हिंदी सिनेमात काम केले आहे. काही कालावधीनंतर त्यांनी हिंदी सिनेमात काम करणे बंद करून केवळ मराठी सिनेइंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली. आपल्या अभिनय कौशल्याने त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळाच ठसा उमटवला आहे. 

सीमा देव यांचा जन्म मुंबईतील गिरगाव येथे झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव नलिनी सराफ होते. १९५७ साली 'आलिया भोगासी' या मराठी चित्रपटादतून त्यांनी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. या चित्रपटात त्यानी रमेश देव यांच्या बहिणीची भूमिका केली होती. त्यांनी भूमिका साकारलेले जगाच्या पाठीवर, मोलकरीण, यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला हे चित्रपट विशेष गाजले. 'आनंद' या अत्यंत गाजलेल्या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका आजही कायम लक्षात राहते. 

टॅग्स :अजिंक्य देव