Join us  

सोनिका चौहान मृत्यू प्रकरणी अभिनेता विक्रम चॅटर्जीला अटक

By admin | Published: July 07, 2017 10:20 AM

प्रो कबड्डी लीगची अँकर सोनिका चौहान हीच्या मृत्यू प्रकरणी दक्षिण विभागातील पोलिसांच्या विशेष पथकाने अभिनेता विक्रम चॅटर्जीला अटक केली आहे.

ऑनलाइन लोकमत

कोलकाता, दि. 7- प्रो कबड्डी लीगची अँकर सोनिका चौहान हीच्या मृत्यू प्रकरणी दक्षिण विभागातील पोलिसांच्या विशेष पथकाने अभिनेता विक्रम चॅटर्जीला अटक केली आहे. सोनिकाच्या मृत्यूशी संबधित काही गोष्टी विक्रम लपवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या संशयाने त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे. द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे. 29 एप्रिल रोजी अभिनेता विक्रम चॅटर्जी आणि सोनिका कारने एकत्र प्रवास करत असताना विक्रमचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार दुभाजकावर जाऊन आदळल्याने अपघात झाला होता. या अपघातात सोनीकाचा मृत्यू झाला होता. 
 
अपघाताच्या वेळी विक्रम जास्त स्पीडने गाडी चालवत असल्याचं अनेक फॉरेन्सिकच्या अहवालात स्पष्ट झालं आहे. गुरूवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास विक्रम चॅटर्जी बाहेर जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी छापा टाकून अॅक्रोपॉलिस मॉलच्या बाहेर कॅबमधून विक्रमला अटक केली आहे. सगळ्या आवश्यक गोष्टींची पूर्तताकरून विक्रमला कोर्टासमोर हजर केलं जाणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त विशाल गर्ग यांनी दिली आहे. चौकशीचा भाग म्हणून विक्रमला अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं पण अटके मागचं मुळ कारण सांगायला त्यांनी टाळाटाळ केली आहे. विक्रमला अचानक अटक करून प्रमुख प्रकरणावरून सगळ्यांचं लक्ष विचलित करण्याचा पोलिस प्रयत्न करत असल्याचं विक्रमच्या मित्रांनी म्हंटलं आहे. कोलकाता हायकोर्टात 12 किंवा 13 जुलै रोजी विक्रमच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. 
आणखी वाचा
 

...म्हणून चीन विरुद्ध भारत नाही हटणार मागे

हिजबुलचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीन रचतोय कट, सुरक्षा यंत्रणा सतर्क

लालू प्रसाद यादव गोत्यात! सीबीआयने दाखल केला गुन्हा

कोण होती सोनिका चौहान ?

प्रो कबड्डी लीगमधून सोनिका सूत्रसंचालकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. प्रो कबड्डीतील तिच्या सूत्रसंचालनाने अनेकांची मनं जिंकली होती.
 
‘स्टार स्पोर्ट्स’ आणि ‘एनडीटीव्ही २४x७’च्या काही कार्यक्रमांसाठी तिने सूत्रसंचालन केलं होतं. एनडीटीव्ही २४x७वरील "टॉक विथ स्टार्स" या कार्यक्रमाने सोनिकाला चांगलीच पसंती दिली होती.
 
सोनिकाला क्रीडा क्षेत्राची आवड असल्याने तिने ‘प्रो कबड्डी’च्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली होती. २०१३ च्या‘मिस इंडिया’ ब्युटी कॉन्टेस्टमध्ये सोनिका सहभागी झाली होती.
 
‘चॅनल व्ही’मध्ये सोनिकाने व्हिडिओ जॉकी म्हणून काम केलं होतं.