Join us

अभिनेत्री सुधा शिवपुरी यांचे निधन

By admin | Updated: May 20, 2015 15:01 IST

'क्योंकी सास भी कभी बहू थी' मालिकेत 'बा'ची गाजलेली भूमिका करणा-या अभिनेत्री सुधा शिवपुरी यांचे आज निधन झाले.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २० -  टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय मालिका असलेल्या 'क्योंकी सास भी कभी बहू थी' मधील 'बा'  अर्थातच अभिनेत्री सुधा शिवपुरी यांचे आज निधन झाले. त्या ७७ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा व मुलगी आहेत.

राजस्थानमध्ये जन्मलेल्या सुधा यांचे १९६८ साली ओम शिवपुरी यांच्याशी लग्न झाले, त्यानंतर त्यांनी दिल्लीत थिएटरमध्ये काम करण्यास सुरूवात केली. दोघांनी मिळून 'दिशांतर' नावाची कंपनी स्थापन केली, ज्याअंतर्गत अनेक नाटकांचे दिग्दर्शनही करण्यात आले. त्यात 'आधे अधुरे', 'तुघलक' अशा नाटकांचा समावेश होता. त्यांनी 'स्वामी', 'इन्साफ का तराजू', 'अलका', 'पिंजर','हमारी बहू', 'दि बर्निंग ट्रेन', 'सावन को आने दो' अशा अनेक चित्रपटांत काम केले होते. 

या मालिकेतील 'तुलसी'च्या भूमिकेमुळे घराघरांत पोचलेल्या अभिनेत्री आणि मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी सुधा शिवपुरी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. मी जरी 'बा'सोबत काही वर्षेच घालवू शकले तरी त्या माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या. त्यांनी मला जे संस्कार, मूल्य दिली ते शेवटपर्यंत माझ्यासोबत राहतील. माझ्या खासगी व राजकीय जीवनातही त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले, असे स्मृती यानी सांगितले.