विजयादशमीदिनी रामाने रावणाचा वध केल्याचे पुराणात सांगितले आहे. त्याचा भगवान रामाने वध केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. तेव्हा राम म्हणाले की, रावणाला मी नव्हे, तर त्याच्या अहंकाराने मारले आहे.आता योगायोग बघा. त्याच दिवशी वादग्रस्त बातमी पार्श्वगायक अभिजित भट्टाचार्य यांच्याबाबत होती. दुर्गादेवीच्या मंडपात भट्टाचार्य यांनी एका महिलेची छेडछाड केल्याचा आरोप झाला असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अर्थात, अभिजित यांनी हा आरोप फेटाळून लावला असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. पोलिसांचा तपास पूर्ण होईपर्यंत या प्रकरणी निश्चित असे काही सांगता येत नाही.रामाने केलेला रावणाचा वध आणि अभिजित यांचे हे प्रकरण यांचा संबंध कसा जोडता येईल? या प्रश्नाचे उत्तर फारच सोपे आहे. रावणाचा नायनाट ज्याप्रमाणे त्याच्या अहंकाराने केला, तसाच काहीसा प्रकार अभिजित यांच्याबाबत घडत आहे, असे म्हणता येईल. येथे अभिजित यांनी केलेली कथित छेडछाड आणि यापूर्वीची त्यांची काही वादग्रस्त प्रकरणे पाहता त्यांचा अहंकारच त्यांच्यासमोरील मुख्य अडचण असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे अभिजित यांना त्याची जाणीव होत नाही असे दिसते.अभिजित त्यांच्या काळात असलेल्या गायकांपैकी एक चांगले गायक आहेत, याबाबत संशय नाही. परिश्रम आणि पात्रतेच्या आधारे त्यांनी आजचे स्थान मिळविलेले आहे. आपल्या जादुई आवाजाने त्यांनी लोकप्रियता मिळविली आहे. येथे गायक अभिजित आणि एक मनुष्य म्हणून अभिजित यांना ओळखणे आवश्यक ठरते. गायक म्हणून लोकप्रियता मिळविणारे अभिजित एक चांगला मनुष्य म्हणून प्रसिद्धी मिळवू शकले नाहीत. एकेकाळी त्यांनी सर्व सहकारी गायक आणि संगीतकारांविरुद्ध आघाडी उघडली. त्यामुळे ही सर्व मंडळी त्यांच्यापासून दूर गेली. त्यानंतर त्यांनी अचानक पाकिस्तानी गायकांविरुद्ध मोहीम उघडली.पाकिस्तानातून आलेले गायक आणि कलाकार यांच्याविरुद्ध अभिजित यांनी इतके उग्र रूप घेतले की, त्यांच्यातील संयम आणि शालीनता संपल्याचे स्पष्ट झाले. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा अलीकडेच मुंबईत कार्यक्रम होणार होता. त्याबाबत त्यांनी खूपच गलिच्छ शब्द वापरले. एखाद्याला विरोध करणे किंवा आपले मत मांडणे हा अभिजित यांचा अधिकार आहे; पण या नादात ते मर्यादा ओलांडून एखाद्याचा अपमान करतात, त्यातून त्यांची मानसिकता दिसते.
अहंकार घेणार अभिजितचा बळी
By admin | Updated: October 26, 2015 00:57 IST