Join us  

अभिजीत बिचुकले यांना डॉक्टरेट पदवी बहाल, कोणत्या यूनिवर्सिटीकडून आणि कशासाठी मिळाली डॉक्टरेट ? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 12:47 PM

अभिजित बिचुकले यांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण आला आहे.

कवी मनाचे नेते अभिजित बिचुकले हे नाव महाराष्ट्राला नवं नाही. राजकारणी आणि कलाकार असलेले बिचुकले हे नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत असतात. विशेष म्हणजे बहुआयामी कलावंत असलेले सातारकर आता लोकसभेसाठी स्वतःचं नशीब आजमावणार आहेत. याबाबत ते लवकरच घोषणा करणार आहेत. निवडणुकीत गुलाल उडवण्याआधीच बिचुकले यांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण आला आहे.आता अभिजीत बिचुकले यांना एका विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे. ही डॉक्टरेट पदवी कोणी दिली आणि कशासाठी दिली? याबाबत आपण जाणून घेऊया. 

अभिजीत बिचुकले यांना डॉक्टरेट पदवी मॅजिक आणि आर्ट यूनिवर्सिटीकडून देण्यात आली आहे. कला व मनोरंजन क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांचा हा गौरव करण्यात आला आहे. याबाबत साम टीव्हीशी  बोलताना अभिजित बिचुकले म्हणाले, 'हा आनंदाचा क्षण आहे. लोक आणि विद्यापीठ माझी दखल घ्यायला लागले आहेत. हे फक्त माझ्या कर्मामुळे झालं. कर्म माझं चांगलं आहे. २३ मे १९९६ रोजी म्हणजेच २८ वर्षांपूर्वी क्षितिज नावाचा मी एक बालकविता संग्रह प्रकाशित केला होता. तेव्हा मी अवघ्या २० वर्षांचा होतो, तिथून माझा प्रवास सुरू झाला. तुमच्यासारख्या माध्यमांना माझा प्रवास माहितीच आहे'.

पुढे ते म्हणाले, 'मराठी बिग बॉस, हिंदी बिग बॉस असेल, मी तिथे ठसा उमटवला. सातारा जिल्ह्याची मी ओळख बनलो. सातारा जिल्हा, महाराष्ट्र हा जगाच्या नकाशावरती नेण्यामध्ये माझं योगदान आहे. त्यामुळे या विद्यापिठानं माझ्याशी संपर्क साधला. ते विविध राज्यातल्या नामांकित लोकांना शोधत होते. त्यांनी माझं नाव नॉमिनेट करून मला ही डॉक्टरेट दिली आहे. आता इथूनपुढे मी डॉक्टर अभिजीत वामनराव आव्हाडे-बिचुकले असं लावू शकतो'.

अभिजित बिचुकले म्हणाले, 'ही पदवी आपल्याला स्व:कष्टाने आणि स्व:कर्माने मिळाली आहे. यूनिवर्सिटीचे फाऊंडर इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये आले होते. ते जादूगर आहेत आणि ते विद्यापिठाचे प्रमुख आहेत. 'बिग बॉस हिंदीमध्ये तुम्ही जी काही धमाल उडवून दिली. तुम्ही गाता, तुम्ही कविता करता, महाराष्ट्रात राहता आणि मराठीत तुमचं नाव खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला डॉक्टरेट देत आहोत. तुम्ही स्वीकार करालं?' असं त्यांनी मला विचारलं. त्यामुळे मी डॉक्टरेट पदवी स्वीकारली, असे बिचुकले यांनी सांगितलं. य़ासोबतच ते लोकसभा निवडणूक कोणत्या मतदारसंघातून लढायची याविषयीची घोषणातील लवकरच करणार आहेत.  

टॅग्स :अभिजीत बिचुकलेसेलिब्रिटी