ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - बॉलिवुडचा सुपरस्टार सलमान खान आज ५० वर्षांचा झाला. पण अजूनही सलमान स्वत:ला २७ वर्षांचा समजतो. माझ्यासाठी २७ हे योग्य वय आहे. मला वाढत्या वयाची भिती वाटत नाही, मी नेहमीच २७ वर्षांचा राहीन. वाढत वय हा आयुष्याचा एक भाग आहे असे सलमानने सांगितले.
सलमान खान हा प्रसिध्द चित्रपटलेखक सलीम खान यांचा मुलगा. सलमानने बॉलिवुडमध्ये पदार्पण केले तेव्हा त्याच्याकडे आजच्यासारखी शरीरयष्टी नव्हती. सडपातळ शरीरयष्टीचा हा मुलगा उद्याचा मोठा स्टार होईल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. 'बिवी हो तो ऐसी' या चित्रपटातून बॉलिवुडमध्ये पदार्पण करणा-या सलमानचा दुसराच चित्रपट 'मैंने प्यार किया' सुपरडूपर हिट झाला. या चित्रपटाच्या गाण्यांबरोबरच सलमानने या चित्रपटातून आपले अभिनयाचे नाणेही खणखणीत वाजवून दाखवले आणि बॉलिवुडला एक नवा स्टार मिळाला.
सलमान आजचा सुपरस्टार असला तरी, तो इतक्या सहजतेने इथपर्यंत पोहोचलेला नाही. सलमानने आयुष्यात अनेक चढ-उतार अनुभवले, खस्ता खालल्ल्या. काळवीट शिकार प्रकरण, हिट अँण्ड रन प्रकरणामुळे त्याच्या डोक्यावर नेहमीच अटकेची टांगती तलवार राहिली. अभिनेत्री ऐश्वर्या राय सोबतचे त्याचे प्रेम प्रकरण माध्यमांमध्ये बरेच गाजले.
सलमानने शनिवारी रात्री पनवेलच्या त्याच्या फार्महाऊसवर ५० वा वाढदिवस साजरा केल्याची चर्चा आहे. यावेळी इंडस्ट्रीतील त्याचे अनेक मित्र उपस्थित होते. सलमानसाठी हा ५० वा वाढदिवस तसा खासच आहे. यावर्षी आलेल्या त्याच्या बजरंगी भाईजान आणि प्रेम रतन धन पायो या दोन चित्रपटांनी २०० कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला तसेच तेरावर्षांपासून सुरु असलेल्या हिट अँण्ड रन खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाने त्याची निर्दोष सुटका केली.