ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - प्रसिद्ध कॉमेडीयन कपिल शर्मा आणि अभिनेता सुनील ग्रोव्हर यांच्यात झालेला वाद सगळयांना माहिती आहे. या वादावर भाष्य करताना अभिनेत्री आणि स्तंभलेखिका ट्विंकल खन्नाने आपल्या खास शैलीत कपिल शर्माला टोले लगावले आहेत. 30 हजार फूट उंचीवर असताना कशाचेही शस्त्र बनू शकते. अगदी तुमच्या पायातील चप्पल आणि स्कॉच सुद्धा शस्त्र बनू शकते असे टि्ंवक्लने टाइम्स ऑफ इंडियामध्ये लिहीलेल्या स्तंभामध्ये म्हटले आहे.
विमान कंपन्या नियमितपणे चाकू, कैची आणि क्रिकेट बॅट सारख्या वस्तू जप्त करत असतात. पण त्याचबरोबर अशा आणखी काही गोष्टी आहेत ज्या विमान 30 हजार फूट उंचीवर असताना शस्त्रांमध्ये बदलू शकतात. माचिस कांडयांची तस्करी करुन तुमच्या स्कॉचला पेटवा असे मला म्हणायचे नाही पण स्कॉच गळयाखाली उतरल्यानंतर तितकीच धोकादायक असते ट्विंकलने म्हटले आहे.
ऑस्ट्रेलिया येथे शो झाल्यानंतर एअर इंडियाच्या विमानाने मायदेशी परतत असताना मद्याच्या अंमलाखाली असलेल्या कपिल शर्माने सुनील ग्रोव्हरबरोबर वाद घातला होता. त्यावेळी संतापाच्या भरात कपिलने सुनीलवर बूट फेकला होता. तोच धागा पकडून सध्या चप्पलही शस्त्र बनले आहे असे ट्विंकलने म्हटले आहे. या स्तंभात शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार रविंद्र गायकवाड यांचाही उल्लेख आहे. विमान उड्डाणासाठी असते याचा रविंद्र गायकवाडांना विसर पडला होता असे ट्विंकलने म्हटले आहे.