Join us

बजेट देणार का कमाईची संधी? कंपन्यांचे तिमाही निकाल आणि अमेरिकेच्या जीडीपीकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 06:42 IST

गतसप्ताह हा प्रारंभापासूनच चांगला राहिला मात्र अखेरच्या दिवशी मायक्रोसॉफ्टचे संकट आणि विक्रीचा दबाव यामुळे बाजार घसरला. त्याचा मोठा फटका मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या समभागांना बसला.

प्रसाद गो. जोशीया सप्ताहामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प जाहीर होणार असून त्याकडे बाजाराचे बारीक लक्ष आहे. त्या जोडीलाच विविध कंपन्यांचे जाहीर होणारे तिमाही निकाल आणि अमेरिकेच्या जीडीपीची आकडेवारी याचाही परिणाम बाजारावर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पाच्या पोतडीतून बाजाराला चालना देणाऱ्या बाबी बाहेर पडण्याची अपेक्षा असून त्या कितपत पूर्ण होतात त्यावरच बाजाराची भरारी अवलंबून आहे.

गतसप्ताह हा प्रारंभापासूनच चांगला राहिला मात्र अखेरच्या दिवशी मायक्रोसॉफ्टचे संकट आणि विक्रीचा दबाव यामुळे बाजार घसरला. त्याचा मोठा फटका मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या समभागांना बसला. त्यामुळे हे दोनही निर्देशांक सप्ताहाचा विचार करता घसरलेले दिसले.

परकीय वित्तसंस्थांकडून खरेदी सुरूच■ मागील महिन्यापासून बाजारात आक्रमकपणे खरेदी करणाऱ्या परकीय वित्तसंस्था गतसप्ताहातही खरेदी करीत असलेल्या दिसल्या. या महिन्याच्या १९ दिवसांमध्ये या संस्थांनी भारतीय समभागांमध्ये ३०, ७७२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.■ या अर्थसंकल्पामध्ये दीर्घकालीन भांडवली नफ्यावरील करामध्ये काही बदल होण्याची अपेक्षा या संस्थांना आहे. त्याबाबत काय घोषणा होते, याकडे त्यांचे लक्ष आहे.■ भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड आणि कंपन्यांचे चांगले आलेले निकाल यामुळे या संस्था भारतीय समभागांमध्ये गुंतवणूक करीत आहेत.

या सप्ताहामध्ये सोमवारी बाजार विविध प्रमुख कंपन्यांच्या तिमाही निकालांवर आपली प्रतिक्रिया देईल. त्याचदिवशी जाहीर होणार अर्थिक आढावाही बाजारावर परिणाम करणारा ठरू शकतो. मंगळवारी अर्थसंकल्प जाहीर झाल्यावर बाजार उसळी घेण्याची मोठी शक्यता आहे. या अर्थसंकल्पामधून अर्थव्यवस्थेला गती देणाऱ्या योजनांची अपेक्षा आहे. शुक्रवारी घसरलेला बाजार मंगळवारी नवीन उंची गाठू शकेल, असे मत काही जाणकारांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :शेअर बाजार