Join us

अर्थसंकल्पाच्या दुसऱ्याच दिवशी मार्केट तोंडावर का आपटलं? ३ महत्त्वाची कारणे समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 14:08 IST

Share Market crashed : केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. यासाठी ३ मोठी कारणे आहेत.

Share Market crashed : केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मध्यमवर्गीय आनंदी आहे. मात्र, भारतीय शेअर बाजारात याच्या उलट परिणाम दिसत आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ नंतर पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स ७०० हून अधिक अंकांनी घसरून ७६,७७४.०५ च्या पातळीवर आला. तर निफ्टी देखील २३,३०० ची महत्त्वाची पातळी सोडून २३,२३९.१५ वर घसरला. जागतिक अनिश्चितता, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नवे शुल्क धोरण, कमकुवत रुपया आणि केंद्रीय अर्थसंकल्पातील पायाभूत सुविधांवर होणारा माफक खर्च यामुळे ही घसरण होत आहे. हा दिवस गुंतवणूकदारांसाठी काळा सोमवार ठरला, कारण बाजारात सर्वत्र मंदीचे वातावरण आहे.

चीन, कॅनडा आणि मॅस्किकोवर नवे आयात शुल्क लागूअमेरिकेच्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर कॅनडा, मॅक्सिको आणि चीनवर नवीन आयात शुल्क (टॅरीफ चार्ज) लादले आहे. या निर्णयानंतर जागतिक व्यापार युद्ध छेडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेने कॅनडा आणि मॅक्सिकोवर २५ तर चीनवर १० टक्के आयात शुल्क लागू केलं आहे. यानंतर या देशांनी प्रतिउत्तर देण्याची धमकी दिली आहे. या निर्णयाला जागतिक व्यापार संघटनेत (डब्ल्यूटीओ) आव्हान देणार असल्याचे चीनने म्हटले आहे.

अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर हात आखडताकेंद्रीय अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर खर्च करताना सरकारने हात आखडता घेतला आहे. परिणामी गुंतवणूकदारांची निराशा झाली. त्यामुळे पायाभूत सुविधांशी संबंधित समभागांमध्ये मोठी विक्री दिसून आली. एल अँड टीचे समभाग ४.४२ टक्क्यांनी घसरले, तर अल्ट्राटेक सिमेंटचे समभाग २ टक्क्यांनी आणि IRCON इंटरनॅशनलचे समभाग ५ टक्क्यांहून अधिक घसरले. अर्थसंकल्पातील भांडवली खर्चात कमी वाढ केल्यामुळे उद्योगविश्वात नाराजी पसरली आहे. या परिणाम शेअर बाजारावर झाला.

रुपयाची ऐतिहासिक घसरणट्रम्प यांनी आयात शुल्काची (टॅरिफ) घोषणा केल्यांतर आशियाई चलनांमध्ये घसरण पाहायला मिळाली. यात भारतीय रुपयाही सुटला नाही. रुपयाने डॉलरच्या तुलनेत विक्रमी नीचांकी पातळी गाठली. रुपया प्रति डॉलर ८७.०७ पर्यंत घसरला आहे. डॉलरला मजबूत मागणी असल्याने रुपया आणखी घसरण्याची अपेक्षा व्यापाऱ्यांना आहे.

या सर्व घटनांचा परिणाम शेअर बाजार कोसळण्यात झाला. गुंतवणूकदारांसाठी हा एक आव्हानात्मक काळ आहे. कारण जागतिक व्यापार युद्धाची भीती, कमकुवत रुपया आणि बजेटमध्ये पायाभूत सुविधांवर कमी खर्च यामुळे बाजाराचा मार्ग अधिक कठीण झाला आहे. येत्या काळात बाजारात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :अर्थसंकल्प २०२५शेअर बाजारशेअर बाजारनिर्देशांक