कोका-कोलाचा शेअर आपल्या दमदार कामगिरीसाठी ओळखला जातो आणि नुकत्याच झालेल्या बाजारातील उलथापालथीदरम्यान त्यानं पुन्हा एकदा व्यापक शेअर बाजारापेक्षा चांगली कामगिरी केलीये. कंपनी सॉफ्ट ड्रिंक्ससारखे असे प्रोडक्ट विकते जे लोक मंदीतही खरेदी करणं थांबवत नाहीत. त्यामुळेच या शेअरच्या कामगिरीवर अनेकदा बाजारातील अस्थिरतेचा परिणाम होत नाही.
सातत्यानं लाभांश देण्याच्या प्रदीर्घ परंपरेमुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांमध्ये हा एक विश्वासार्ह ब्लू चिप स्टॉक बनला आहे. वॉरेन बफे यांची बर्कशायर हॅथवे ही कंपनी १९८८ पासून कोका-कोलाच्या सर्वात मोठ्या भागधारकांपैकी एक आहे.
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
पहिल्या तिमाहीत ११.२२ अब्ज डॉलर्सचा महसूल
मंगळवारी सकाळी कोका-कोलानं पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आणि ११.२२ अब्ज डॉलरचा महसूल मिळवला. हे एलएसईजीच्या ११.१४ अब्ज डॉलर्सच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. प्रति शेअर उत्पन्न (ईपीएस) ७३ सेंट होते, तर तज्ज्ञांनी ७१ सेंटचा अंदाज व्यक्त केला होता. कोलाकोलाचा शेअर ३० एप्रिल रोजी ०.७८ टक्क्यांनी वधारून ७२.३५ डॉलरवर बंद झाला.
आतापर्यंत १७ टक्क्यांची वाढ
गेल्या ५ दिवसांत कोकाकोलाच्या शेअरमध्ये १.३५ टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या १ महिन्यात हा शेअर १.०२ टक्क्यांनी वधारला. गेल्या ६ महिन्यांत कोका-कोलाच्या शेअरमध्ये १०.७८ टक्क्यांची वाढ झाली. तर कोका-कोलाचा शेअर या वर्षी आतापर्यंत १७ टक्क्यांनी वधारलाय. तर, एस अँड पी ५०० मध्ये या वर्षी आतापर्यंत ८.५% वाढ झाली आहे.
.. तर आज मूल्य किती असतं?
कल्पना करा की आपण एक वर्ष, पाच वर्षे, दहा वर्षे किंवा अगदी १९८८ मध्ये (जेव्हा वॉरेन बफे यांनी सुरुवात केली होती) कोका-कोलाचे शेअर्स खरेदी केले असतील आणि प्रत्येक वेळी लाभांश मिळाल्यावर तुम्ही पुन्हा शेअर्समध्ये गुंतवणूक करत असाल. मग आज त्या १००० डॉलरचं मूल्य किती असेल? २८ एप्रिलच्या शेअरच्या किंमतीनुसार गणित जाणून घेऊ.
- जर तुम्ही १ वर्षापूर्वी गुंतवणूक केली असती तर तुमची रक्कम वाढून १,१९५ डॉलर म्हणजेच जवळपास १९.५% नफा झाला असता.
- जर तुम्ही ५ वर्षांपूर्वी गुंतवणूक केली असती तर तुमची रक्कम १,००० डॉलरवरून १,७२८ डॉलर झाली असती. म्हणजेच ७२.८% नफा झाला असता.
- जर तुम्ही १० वर्षांपूर्वी गुंतवणूक केली असती तर तुमच्या रकमेचं मूल्य २,१६३ डॉलर म्हणजेच ११६.३% वाढलं असत.
- जर तुम्ही १९८८ मध्ये गुंतवणूक केली असती, तर १००० डॉलर्सचं आज मूल्य ३६,४८७ डॉलर म्हणजेच ३,५३४ टक्क्यांहून अधिक झालं असतं.
(टीप - यात सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)