Join us

Waaree Renewable Technologies Ltd Share: ३१०००% टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न, आता गुंतवणूकदारांकडून फटाफट विक्री; 'या' वृत्ताचा परिणाम, कोणता आहे स्टॉक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 12:06 IST

Waaree Renewable Technologies Ltd Share: कंपनीचा शेअर आज म्हणजेच शुक्रवारी बीएसईवर १०४४.७० रुपयांवर उघडला. काही काळानंतर कंपनीचा शेअर ७ टक्क्यांहून अधिक घसरून १००१.०५ रुपयांच्या पातळीवर आला.

Waaree Renewable Technologies Ltd Share: वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या शेअर्समध्ये घसरण सुरूच आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण होण्यामागे तिमाही निकाल कारणीभूत असल्याचं मानलं जातंय. कंपनीचा शेअर आज म्हणजेच शुक्रवारी बीएसईवर १०४४.७० रुपयांवर उघडला. काही काळानंतर कंपनीचा शेअर ७ टक्क्यांहून अधिक घसरून १००१.०५ रुपयांच्या पातळीवर आला. बीएसईवर वारी एनर्जीच्या शेअर्सचा दिवसभरातील उच्चांक १०५८.७० रुपये आहे.

निव्वळ नफ्यात १७ टक्के घट

वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजी लिमिटेडला डिसेंबर तिमाहीत ५३.५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. वार्षिक आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात १७ टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ६४.२० कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजी लिमिटेडचे डिसेंबर तिमाहीतील उत्पन्न ३६४ कोटी रुपये आहे. त्यात वार्षिक आधारावर १२ टक्के वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत कंपनीचे उत्पन्न ३२४ कोटी रुपये होते.

कंपनी देणार लाभांश

वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीजनेही लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या शेअरवर कंपनी १ रुपये लाभांश देईल. कंपनीनं या लाभांशासाठी २४ जानेवारी ही विक्रमी तारीख निश्चित केली आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांचं नाव या दिवशी कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये राहील, त्यांनाच लाभांश मिळणार आहे.

गेले ६ महिने या कंपनीसाठी चांगले गेले नाही. या काळात कंपनीच्या शेअरच्या किंमतीत ४६ टक्क्यांची घसरण झाली आहे. वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजी लिमिटेडनं ५ वर्षात ३१००० टक्क्यांहून अधिक परतावा दिलाय.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक