Join us

ट्रम्प यांचं एक वक्तव्य गुंतवणूकदारांना भोवलं? अमेरिकन बाजार आपटला; डॉलरही घसरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 11:53 IST

US Stock Market : टॅरिफला स्थगिती दिल्यानंतर सावरत असलेला अमेरिकन शेअर बाजार पुन्हा एकदा लाल रंगात दिसत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानाने बाजार घसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

US Stock Market : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गुंतवणूकदारांना शांत झोपू देतील असं वाटत नाही. याआधी आयात शुल्काची घोषणा केल्यानंतर अमेरिकेसह जगभरातील शेअर बाजार कोसळले होते. त्यानंतर ९० दिवसांची स्थगिती दिल्यानंतर बाजार हळूहळू सावरत होते. पण, हा दिलासा फार काळ टिकला नाही. पुन्हा एकदा अमेरिकन शेअर बाजारात गोंधळ उडाला आहे. सोमवारी, तिन्ही निर्देशांक - डाऊ जोन्स, नॅस्डॅक आणि एस अँड पीमध्ये मोठी घसरण झाली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी यूएस फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांच्यावर निशाणा साधला. ट्रम्प यांनी मध्यवर्ती बँकेच्या स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित केले. यामुळे बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने निर्देशांक २ टक्क्यांहून अधिक घसरला. एवढेच नाही तर डॉलर निर्देशांकातही मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे.

अमेरिकेतील तिन्ही इंडेक्स घसरलेसोमवारी ट्रेडिंग दरम्यान, मायक्रोसॉफ्टपासून एनव्हीआयडीएपर्यंत आणि अ‍ॅपलपासून टेस्लापर्यंतच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. रॉयटर्सच्या अहवालानुसार, सर्वात मोठी घसरण मॅग्निफिसेंट सेव्हन ग्रुपमध्ये समाविष्ट असलेल्या स्टॉकमध्ये दिसून आली, जे नॅस्डॅकवर प्रभाव पाडतात. यामुळे, व्यवहाराच्या शेवटी, डाऊ जोन्स इंडस्ट्रियल सरासरी २.४८% च्या घसरणीसह बंद झाली, तर एस अँड पी ५०० निर्देशांक २.३६% च्या घसरणीसह बंद झाला. नॅस्डॅक कंपोझिटमध्येही २.५५ टक्क्यांची तीव्र घसरण दिसून आली.

यूएस बाजारात का झाली घसरण?डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे आधीच व्यापार युद्धाचा भडका उडाला आहे. अशा परिस्थितीत आता फेड प्रमुखांवरील त्यांच्या टीकेमुळे या गोंधळात आणखी भर पडली आहे. त्याचा परिणाम केवळ शेअर बाजारांवरच दिसून येत नाही, तर अमेरिकन डॉलर निर्देशांकही ३ वर्षांच्या नीचांकी ९७.९२ वर घसरला आहे.

वाचा - ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकन कंपनीलाच? अ‍ॅपलनंतर गुगलने घेतला मोठा निर्णय

पॉवेल यांच्याबाबत ट्रम्प यांनी नेमकं काय म्हटलं?राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावरुन फेड रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयाने अमेरिकेत मंदी येण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. यानंतर ट्रम्प यांनीही पॉवेल यांच्यावर निशाणा साधला. फेड रिझर्व्हने रेपो दरात कपात न केल्याने ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये पॉवेल यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, की 'जर मला त्यांना बाहेर काढायचे असते तर ते खूप लवकर बाहेर पडले असते, माझ्यावर विश्वास ठेवा, मी त्यांच्यावर खूश नाही.'

टॅग्स :टॅरिफ युद्धडोनाल्ड ट्रम्पशेअर बाजारशेअर बाजार