Join us

अस्वस्थ करणारी गटांगळी, चीन ओढताेय तुमचा पैसा! कसा? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 07:28 IST

गत सप्ताहामध्ये बाजारात अस्थिरता असली तरी प्रमुख निर्देशांकांनी वाढीव पातळी गाठली आहे.

प्रसाद गो. जोशी 

गत सप्ताहामध्ये बाजारात अस्थिरता असली तरी प्रमुख निर्देशांकांनी वाढीव पातळी गाठली आहे. मात्र मिडकॅप आणि स्मॉलकॅप या निर्देशांकांनी खाल्लेली गटांगळी ही अस्वस्थ बनविणारी आहे. आगामी सप्ताहामध्ये एफ ॲण्ड ओ व्यवहारांची सौदापूर्ती असल्याने बाजारात अस्थिरता राहील. त्यातच प्रजासत्ताक दिनानिमित्त बाजार बंद राहणार असल्याने हा सप्ताह छोटा राहील. आगामी सप्ताहात कंपन्यांची तिमाही कामगिरी, परकीय वित्तसंस्थांचे व्यवहार तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाचे दर यावर बाजाराची वाटचाल अवलंबून राहील.<

आगामी सप्ताहामध्ये परकीय वित्त संस्था काय धोरण स्वीकारतात हे बघणे महत्त्वाचे आहे. या संस्था भारतीय बाजारातून पैसा काढून घेऊन चीनमध्ये गुंतविण्यास प्रोत्साहन देत आहेत. बाजार सातत्याने खाली वर जात असला तरी प्रमुख निर्देशांक हे सप्ताहाअखेरीस वाढीव पातळीवर बंद झाले. मात्र मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्ये घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये अनुक्रमे ३६०.५९ व ६९.०५ अंशांची वाढ झाली. निफ्टीने पुन्हा १८ हजार अंशांचा टप्पा ओलांडला आहे. असे असले तरी मिडकॅप निर्देशांक १६५.७८ अंशांनी खाली येऊन २५,००५.१९ अंशांवर स्थिरावला तर स्मॉलकॅपमध्ये २२८.११ अंशांची घट झाली. 

एफ ॲण्ड ओ व्यवहारांची सौदापूर्ती बुधवारी होणार असून त्यादिवशी बाजार खाली येण्याचीच मोठी शक्यता आहे. गुंतवणूकदारही आगामी अर्थसंकल्प डोळ्यासमोर ठेवून सावध पावित्रा घेत आहेत. 

परकीय वित्तसंस्थांची विक्रीजानेवारी महिन्यामध्ये परकीय वित्तसंस्थांनी भारतीय बाजारामधून १५,२३६ कोटी रुपये काढून घेतले आहेत. भारतीय बाजारामध्ये ज्या समभागांना चांगला लाभ मिळत आहे, त्यामधील रक्कम  काढून ती चीनमध्ये गुंतविण्याचे धोरण या संस्थांनी आरंभले आहे. त्यामुळे भारतीय बाजाराला फटका बसत आहे.

 

टॅग्स :शेअर बाजारचीन