Join us

Unimech Aerospace and Manufacturing IPO: युनिमेक एअरोस्पेसच्या आयपीओच्या बंपर लिस्टिंगची शक्यता; गुंतवणूकदारांच्या उड्या, GMP किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 10:57 IST

Unimech Aerospace and Manufacturing IPO: या आयपीओमध्ये गुंतवणूकीचा आज अखेरचा दिवस आहे. इंजिनीअरिंग सोल्युशन्सवर काम करणारी ही कंपनी बाजारातून ५०० कोटी रुपये उभारणार आहे.

Unimech Aerospace and Manufacturing IPO: २०२४ सालचा शेवटचा आयपीओ युनिमेक एरोस्पेस अँड मॅन्युफॅक्चरिंगमध्ये (Unimech Aerospace and Manufacturing) गुंतवणुकीची उत्तम संधी आहे. या आयपीओमध्ये गुंतवणूकीचा आज अखेरचा दिवस आहे. इंजिनीअरिंग सोल्युशन्सवर काम करणारी ही कंपनी बाजारातून ५०० कोटी रुपये उभारणार असून कंपनीनं प्रति शेअर ७४५ ते ७८५ रुपये प्राइस बँड निश्चित केला आहे.

गुंतवणूकदारांमध्ये उत्साह

युनिमेक एरोस्पेस अँड मॅन्युफॅक्चरिंगचा आयपीओ २३ डिसेंबर रोजी खुला झाला असून २६ डिसेंबर २०२४ ही आयपीओमध्ये गुंतवणुकीची शेवटची तारीख आहे. आयपीओ सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसातच त्यानं गुंतवणूकदारांचं लक्ष वेधून घेतलं. याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, पहिल्या दोन दिवसांत आयपीओ ९.०९ पट सब्सक्राइब झाला. इन्स्टिट्युशनल बायर्ससाठी राखीव कोटा ४.६४ पट, नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा कोटा १२.०७ पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव कोटा १०.३० पट सबस्क्राइब झाला. कर्मचाऱ्यांचा राखीव कोटा आतापर्यंत १५.५६ पट सबस्क्राइब करण्यात आला आहे.

आयपीओ ३१ डिसेंबरला लिस्ट होणार

युनिमेक एअरोस्पेस आयपीओमध्ये उभारलेल्या ५०० कोटी रुपयांपैकी २५० कोटी रुपये नव्या शेअर्सच्या माध्यमातून आणि २५० कोटी रुपये ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून उभे केले जात आहेत. आयपीओच्या अलॉटमेंटचा निर्णय २७ डिसेंबर रोजी घेतला जाईल आणि वर्ष २०२४ चं शेवटचं ट्रेडिंग सत्र ३१ डिसेंबर २०२४ रोजी आयपीओ बीएसई-एनएसईवर लिस्ट होईल.

आर्थिक कामगिरी उत्तम

यात १९ शेअर्सचा लॉट साइज असून त्यासाठी गुंतवणूकदारांना १४ हजार ९१५ रुपये मोजावे लागणार आहेत. गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त १४ लॉटसाठी अर्ज करता येतील. आनंद राठी सिक्युरिटीज इक्विरस कॅपिटल आयपीओचे प्रमुख व्यवस्थापक आहेत आणि केएफआयएन टेक्नॉलॉजीज रजिस्ट्रार आहेत. आर्थिक कामगिरी पाहिली तर २०२२-२३ या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल ९४.९४ कोटी रुपये आणि नफा २२.८१ कोटी रुपये होता. तर २०२३-२४ या आर्थिक वर्षात महसूल २१३.७९ कोटी रुपये आणि नफा ५८.१३ कोटी रुपये होता.

जीएमपी किती?

युनिमेच एअरोस्पेसचा जीएमपी ५१० रुपयांवर आहे. म्हणजेच ३१ डिसेंबरला शेअरची बंपर लिस्टिंग शक्य असून ६५ टक्क्यांच्या वाढीसह हा शेअर १२९५ रुपयांवर लिस्ट होऊ शकतो.

(टीप : यामध्ये केवळ सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार