Join us

विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 16:42 IST

Tata Stocks Slow Growth: २०२३ आणि २०२४ मध्ये मल्टीबॅगर रिटर्न देणाऱ्या टाटा ग्रुपच्या शेअर्सचा उत्साह २०२५ मध्ये थंडावला आहे. या वर्षी बहुतेक टाटा शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

२०२३ आणि २०२४ मध्ये मल्टीबॅगर रिटर्न देणाऱ्या टाटा ग्रुपच्या शेअर्सचा उत्साह २०२५ मध्ये थंडावला आहे. या वर्षी बहुतेक टाटा शेअर्समध्ये घसरण झाली आहे आणि त्यामुळे समूहाचे एकूण बाजार भांडवल १५% पेक्षा जास्त कमी होऊन २६.५६ लाख कोटींवर आलंय. २०२४ मध्ये ते ३१.१० लाख कोटी रुपये होतं. २०२३ मध्ये टाटा ग्रुपचे शेअर्स ३३% आणि २०२४ मध्ये १२% वाढले. या वर्षी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS शेअर) सर्वाधिक घसरला आहे.

२०२३ आणि २०२४ मध्ये, टाटा ग्रुपच्या १२ कंपन्यांनी ५०% ते ३००% पर्यंत परतावा दिला. ट्रेंट ३००% पेक्षा जास्त वाढला, तर टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन आणि इंडियन हॉटेल्सनं २४०% पेक्षा जास्त वाढ नोंदवली. इंडियन हॉटेल्समध्ये १५०%, ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवामध्ये १३०% आणि टाटा पॉवर आणि ओरिएंटल हॉटेल्समध्ये ९०% पेक्षा जास्त वाढ झाली.

सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

टीसीएस मार्केट कॅप घसरलं

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचं मार्केट कॅप २०२५ मध्ये सर्वात जास्त ₹३.९१ लाख कोटींपेक्षा जास्त घसरलं आहे. ट्रेंटचे मार्केट कॅप देखील ₹५७,००० कोटींपेक्षा जास्त घसरलंय. टाटा मोटर्स, इंडियन हॉटेल्स आणि व्होल्टासचे एकूण मूल्य ₹१४,००० कोटींपेक्षा जास्त घसरलंय. तेजस नेटवर्क्सचा शेअर ५०% पेक्षा जास्त घसरलाय आणि त्यामुळे कंपनीचे मार्केट कॅप ₹१०,००० कोटींपेक्षा जास्त घसरलं आहे.

टायटननं ताकद दाखवली

टाटा टेक्नॉलॉजीज आणि टाटा एलेक्ससी यांचे मार्केट कॅप अनुक्रमे ₹८,४०० कोटी आणि ₹६,६०० कोटींनी कमी झालं. तथापि, टायटन कंपनी आणि टाटा स्टीलच्या शेअर्सनी समूहातील इतर शेअर्सच्या तुलनेत कामगिरी केली आहे आणि या वर्षी आतापर्यंत त्यांची वाढ झाली आहे. दोन्ही कंपन्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन ₹२७,००० कोटींनी वाढले आहे. टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्सच्या शेअर्समध्येही या वर्षी वाढ झाली आहे आणि कंपनीचे मार्केट कॅप ₹१७,००० कोटींपेक्षा जास्त वाढलं आहे.

पुढे काय होईल

या वर्षी टाटा समूहाच्या शेअर्सची कामगिरी कमकुवत असली तरी, भविष्यात त्यात वाढ होऊ शकते. SAMCO सिक्युरिटीजचे संशोधन विश्लेषक दिव्यम मौर म्हणतात की २०२३-२४ मध्ये टाटाच्या शेअर्सची किंमत लक्षणीयरीत्या वाढली आहे. सध्याचा टप्पा हा एक कन्सोलिडेशनचा टप्पा आहे. इलेक्ट्रिक वाहनं, रिन्युएबल एनर्जी, सेमीकंडक्टर आणि डिजिटल प्लॅटफॉर्मसारखे लाँग टर्म ग्रोथ ड्रायव्हर्स कायम आहेत.

आता बाजाराचं लक्ष टाटा कॅपिटलच्या बहुप्रतिक्षित आयपीओवर आहे, जो सप्टेंबरच्या अखेरीस येण्याची अपेक्षा आहे. तथापि, तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की याचा परिणाम संपूर्ण टाटा समूहाच्या शेअर्सवर होणार नाही. एसबीआय सिक्युरिटीजचे सनी अग्रवाल म्हणतात, "प्रत्येक कंपनीचं मूल्यांकन तिच्या स्वतःच्या ताकद आणि कामगिरीच्या आधारे केलं जाईल."

(टीप- यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक