Stock Market Minutes : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर करवाढीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मंगळवारी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. वाहन सोडता बहुतेक क्षेत्रातील दिग्गज शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. परिणाम गुंतवणूकदारांना एकाच दिवसात २ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा सहन करावा लागला आहे. त्यामुळे सोमवारी मिळवलेली वाढ आज गमावली.
बाजार कोणत्या पातळीवर बंद झाला?
- सेन्सेक्स ३०८.४७ अंकांनी घसरून ८०,७१०.२५ वर बंद झाला.
- निफ्टी ५० देखील ७३.२० अंकांनी घसरून २४,६४९.५५ वर बंद झाला.
- आजच्या सत्रात ऑटो वगळता सर्वच क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात होते. जवळपास २१८४ शेअर्समध्ये घसरण झाली, तर १७०८ शेअर्स वधारले.
कोणत्या शेअर्समध्ये घसरण झाली?
- या घसरणीमध्ये अनेक प्रमुख शेअर्स होते. अदानी पोर्ट्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, एच डी एफ सी बँक आणि सन फार्मास्युटिकल यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे शेअर्स घसरले.
- मात्र, काही शेअर्समध्ये वाढही दिसून आली. टायटन, मारुती, भारती एअरटेल, बजाज फायनान्स आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती.
रुपयाची किंमत घसरलीशेअर बाजारासोबतच रुपयाची किंमतही घसरली. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया १६ पैशांनी कमकुवत होऊन **८७.८२ वर बंद झाला. भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत असलेल्या अनिश्चिततेमुळे रुपया अजून घसरण्याची शक्यता आहे, असे परकीय चलन व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
वाचा - टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
आशियाई बाजारात काय परिस्थिती?जागतिक शेअर बाजाराचा विचार करता, आजचा दिवस आशियाई बाजारासाठी सकारात्मक ठरला. दक्षिण कोरियाचा कोस्पी, शांघायचा एसएसई कंपोझिट इंडेक्स, हाँगकाँगचा हँग सेंग आणि जपानचा निक्केई २२५ हे सर्व निर्देशांक तेजीसह बंद झाले. युरोपीय बाजारातही वाढ दिसून आली, जिथे बाजार हिरव्या रंगात व्यवहार करत होते. सोमवारी अमेरिकेचा बाजारही वाढीसह बंद झाला होता. या सकारात्मक वातावरणातही, जागतिक तेलाच्या किमती मात्र घसरल्या. ब्रेंट क्रूड १.०२ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ६८.०६ डॉलरवर आला.