Donald Trump : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत आल्यानंतर अनेक आक्रमक निर्णय घेतले आहेत. काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी कॅनडा, मॅक्सिको आणि चीनवर आयात शुल्क लादण्याची घोषणा केली होती. यात आता आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. ट्रम्प यांनी देशात येणारे स्टील आणि ॲल्युमिनियमवर २५ टक्के आयातशुल्क लावण्याचा इशारा दिला आहे. याबाबत लवकरच घोषणा करणार असल्याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. या घोषणेमुळे बाजारात मेटल स्टॉक्समध्ये सोमवारी घसरण झाल्याचे दिसून आले.
जेएसडब्ल्यू आणि टाटा स्टील यांच्या शेअर्समध्ये २ टक्के घट झाली. अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारताच्या सुमारे १ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला धोका निर्माण होऊ शकतो.
उद्योगांना बसणार फटका अमेरिकेच्या एकूण स्टील आयातीत भारताचा वाटा ५ टक्के इतका आहे. परंतु भारतातील ॲल्युमिनियम उद्योगाला या निर्णयाचा फटका बसू शकतो. अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीत ॲल्युमिनियमचा वाटा १२ टक्के आहे.
कोणत्या देशांचे नुकसान?अमेरिका सर्वाधिक स्टील आयात कॅनडा, ब्राझील आणि मेक्सिको या देशांकडून करते. यानंतर दक्षिण कोरिया आणि व्हिएतनाम यांचा क्रम लागतो. २०२४ च्या ११ महिन्यांत अमेरिकेच्या ॲल्युमिनियम आयातीपैकी ७९% पुरवठा कॅनडाने केला होता.
आठवड्याच्या पहिल्या दिवशी मेटल स्कॉक्समध्ये सर्वाधिक घसरणसोमवारी व्यवहारात निफ्टी, ट्रेंट, पॉवर ग्रिड कॉर्प, टाटा स्टील, टायटन कंपनी, ओएनजीसी या दिग्गज कंपन्याच्या शेअर्सला मोठा धक्का बसला. तर कोटक महिंद्रा बँक, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टाटा ग्राहक उत्पादने यांच्या वाढ झाली. आजच्या व्यवहारात निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक २-२ टक्क्यांनी घसरले. तर मेटल, मीडिया, फार्मा, कंझ्युमर ड्युरेबल्स, एनर्जी, रियल्टी हे सेक्टरचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झाले.