Join us

१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 14:58 IST

Waaree, Premier Energies shares: शेअर बाजारात आज तेजीचं सत्र कायम आहे. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही बाजारात तेजी दिसून आली.

Waaree, Premier Energies shares: शेअर बाजारात आज तेजीचं सत्र कायम आहे. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही बाजारात तेजी दिसून आली. भारतातील सर्वात मोठी सोलर पीव्ही मॉड्यूल उत्पादक वारी एनर्जीज आणि प्रीमियर एनर्जीजचे शेअर्स कामकाजादरम्यान ८ टक्क्यांपर्यंत वधारले. अमेरिकेनं आग्नेय आशियाई स्पर्धकांवर अँटी डम्पिंग ड्युटी लादल्याची घोषणा केल्यानंतर ही तेजी आली आहे.

कोणत्या शेअरची स्थिती काय आहे?

वारी एनर्जीजचा शेअर ७.५६ टक्क्यांनी वधारून एनएएसईवर २,६२९ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. गेल्या आठ ट्रेडिंग सेशन्सपासून या शेअरमध्ये तेजी असून या कालावधीत स्टॉक २५ टक्क्यांनी वधारलाय. एनएसईवर प्रीमियर एनर्जीजचा शेअर ७.९८ टक्क्यांनी वधारून १,०९० रुपयांवर व्यवहार करत होता. गेल्या आठ दिवसांपासून या शेअरमध्ये तेजी असून या कालावधीत २६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

३५२१ टक्क्यांपर्यंत आयात शुल्क

सीएनबीसी-टीव्ही १८ च्या वृत्तानुसार, अमेरिकेनं कंबोडिया, व्हिएतनाम, मलेशिया आणि थायलंडमधून होणाऱ्या आयातीवर ३५२१ टक्क्यांपर्यंत नवं शुल्क लादलं आहे. अमेरिकेतील सौर ऊर्जा उत्पादकांनी याची मागणी केली होती. हे शुल्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या नव्या व्यापक शुल्काव्यतिरिक्त असेल.

चीनसोबत वाढता तणाव

दरम्यान, चीनच्या हितसंबंधांच्या किंमतीवर अमेरिकेशी व्यापारी करार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशांना प्रत्युत्तर देऊ, अशी धमकी चीननं सोमवारी दिली. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं शुल्क सवलतीच्या बदल्यात चीनबरोबरचे व्यापारी संबंध मर्यादित करण्यासाठी अमेरिका इतर देशांवर दबाव आणण्याच्या तयारीत असल्याच्या वृत्ताला उत्तर देताना हे वक्तव्य केलं.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूकशेअर बाजारटॅरिफ युद्धडोनाल्ड ट्रम्प