मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि कंपनीच्या इतर विद्यमान आणि माजी अधिकाऱ्यांविरोधात दाखल करण्यात आलेल्या ८ अब्ज डॉलरच्या खटल्याची सुनावणी गुरुवारी सुरू झाली. मेटा प्लॅटफॉर्म्सच्या भागधारकांनी हा खटला दाखल केला होता. सीटीव्ही न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशनसोबत (एफटीसी) २०१२ मध्ये झालेल्या कराराचं उल्लंघन करून मेटा (पूर्वीचे फेसबुक) यांनी बेकायदेशीरपणे फेसबुक युजर्सचा डेटा स्टोअर केल्याचा आरोप आहे. अशातच आगामी काळात झुकरबर्ग यांच्यासाठी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते.
नील रिचर्ड्स यांच्या साक्षीनं सुरुवात
रिपोर्टनुसार, वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी लॉ स्कूलमधील प्रायव्हसी एक्सपर्ट नील रिचर्ड्स यांच्या साक्षीनं खटल्याची सुरुवात झाली. त्यांनी न्यायालयाला फेसबुकच्या प्रायव्हसी पॉलिसी दिशाभूल करणाऱ्या असल्याचं म्हटलं. या नॉन-ज्युरी खटल्याची सुनावणी डेलावेअर चॅन्सरी कोर्टाच्या मुख्य न्यायाधीश कॅथलीन मॅककॉर्मिक करत आहेत. या त्याच न्यायाधीश आहेत ज्यांनी गेल्या वर्षी इलोन मस्क यांचं ५६ अब्ज डॉलर्सचं टेस्ला पे पॅकेज रद्द केलं होतं.
१.१७ कोटी आधार कार्ड झाली बंद; 'अशा' लोकांचं आधार कार्ड निष्क्रिय करतंय UIDAI, पाहा डिटेल्स
मार्क झुकरबर्ग व्यतिरिक्त, या खटल्यात शेरिल सँडबर्ग, माजी मेटा सीओओ मार्क अँड्रीसन, व्हेंचर कॅपिटलिस्ट आणि बोर्ड सदस्य पीटर थिएल, पॅलांटीर टेक्नॉलॉजीजचे सह-संस्थापक रीड हेस्टिंग्ज, नेटफ्लिक्सचे सह-संस्थापक आणि व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ जेफ्री जायंट्स यांची नावं देखील आहेत.
कसं सुरू झालं प्रकरण?
मेटा प्रायव्हसीशी संबंधित हे प्रकरण २०१८ मध्ये सुरू झालं, जेव्हा केंब्रिज अॅनालिटिका नावाच्या एका राजकीय सल्लागार फर्मनं लाखो फेसबुक युजर्सचा डेटा अॅक्सेस केल्याचं उघड झालं. ही फर्म २०१६ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षीय निवडणूक प्रचारासाठी काम करत होती. डेटा लीक झाल्यानंतर एफटीसीनं फेसबुकवर ५ अब्ज डॉलर्सचा दंड ठोठावला. कंपनीनं २०१२ च्या कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. मेटाच्या शेअरहोल्डर्सना आता FTC चा दंड आणि इतर कायदेशीर खर्च असे एकूण ८ अब्ज डॉलर्स कंपनीच्या दोषी अधिकाऱ्यांकडून वसूल करायचा आहे. दरम्यान, मेटा किंवा झुकरबर्ग यांनी अद्याप कोणतीही सार्वजनिक टिप्पणी केलेली नाही.