Join us

₹१८ वर जाऊ शकतो हा शेअर; एक्सपर्ट म्हणाले, "कर्ज कमी करणार कंपनी, खरेदी करा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 14:50 IST

Vodafone Idea Share: कंपनी सध्या आपल्यावरील कर्ज कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. तसंच ब्रोकरेजही या शेअरसाठी सकारात्मक आहे.

Vodafone Idea Share: व्होडाफोन आयडियाचे शेअर्स सतत फोकसमध्ये आहेत. कंपनीचा शेअर मंगळवारी १ टक्क्यांहून अधिक घसरून १६.८० रुपयांवर व्यवहार करत होते. परंतु नंतर त्यात वाढ झाली. टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडिया आपलं कर्ज कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. इंडस टॉवर्समधील आपला संपूर्ण हिस्सा २.३ अब्ज डॉलरला विकण्याची कंपनीची योजना आहे. समूहातील अनेक संस्थांच्या माध्यमातून कंपनीकडे मोबाइल टॉवर ऑपरेटरमध्ये २१.५ टक्के हिस्सा आहे. विक्रीचा अंतिम आकार अद्याप निश्चित झालेला नाही. तो २१.५ टक्क्यांपेक्षा कमी असू शकतो. 

ब्रोकरेजचं मत काय ? 

जागतिक ब्रोकरेज कंपनी यूबीएस व्होडाफोन आयडियासाठी सकारात्मक आहे. ब्रोकरेज ने १८ रुपयांच्या टार्गेटसह काउंटरवर आपला 'बाय' कॉल कायम ठेवला आहे. 'हिस्स्याच्या विक्रीची भरपूर शक्यता आहे, तरीही ही रक्कम अपेक्षेइतकी मोठी होणार नाही. शिवाय, व्होडाफोनसाठी हे पाऊल सकारात्मक मानलं जात आहे. भारती व्होडाफोनकडून संपूर्ण हिस्सा खरेदी करण्याची शक्यता नाही, अंशत: खरेदी केल्यास हिस्सा ५० टक्क्यांपेक्षा अधिक वाढविणं शक्य आहे,' असं ब्रोकरेजनं म्हटलंय. 

नुकतीच व्होडाफोन आयडियाने नोकिया इंडिया आणि एरिक्सन इंडिया या आपल्या विक्रेत्यांना आंशिक थकबाकी भरण्यासाठी २,४५८ कोटी रुपयांच्या शेअरचं वाटप करण्याची घोषणा केली. व्होडाफोन आयडियानं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटलंय की, 'कंपनीच्या संचालक मंडळानं कंपनीच्या पुढील इश्यू प्राइसपेक्षा सुमारे ३५ टक्के जास्त किंमतीत प्रेफरेंशियल शेअर अलॉटमेंटला मान्यता दिली आहे. यात सहा महिन्यांचा 'लॉक-इन' कालावधी आहे.' 

शेअरची स्थिती काय? 

गेल्या पाच दिवसांत व्होडाफोन आयडियाचा शेअर ४.२८ टक्क्यांनी वधारला आहे. त्यात एका महिन्यात २२ टक्के वाढ झाली आहे. वर्षभरात हा शेअर १२० टक्क्यांनी वधारला आहे. या दरम्यान त्याची किंमत ७ रुपयांवरून सध्याच्या किंमतीपर्यंत वाढली आहे. याची ५२ आठवड्यांतील उच्चांकी पातळी १८.४२ रुपये आणि ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ७.१८ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप १,१२,८१४.७० कोटी रुपये आहे. 

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :व्होडाफोन आयडिया (व्ही)शेअर बाजार