Join us

तेजी राहणार, गुंतवणूक वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 06:23 IST

कर्जावरील व्याज दरवाढीला रिझर्व्ह बँकेने पूर्णविराम दिल्याने बाजारात संचारलेला उत्साह आगामी सप्ताहामध्येही कायम राहणार का?

प्रसाद गो. जोशी कर्जावरील व्याज दरवाढीला रिझर्व्ह बँकेने पूर्णविराम दिल्याने बाजारात संचारलेला उत्साह आगामी सप्ताहामध्येही कायम राहणार का? हे जाहीर होणाऱ्या विविध आकडेवारीवर ठरणार आहे. देशातील चलनवाढ तसेच महत्त्वाच्या माहिती तंत्रज्ञान आस्थापनांची तिमाही कामगिरी या सप्ताहात जाहीर होणार आहे. त्याचबरोबर अमेरिकेतील बेरोजगारीचा दर जगभरातील शेअर बाजारांवर परिणाम करू शकतो. याशिवाय रुपया-डॉलरची किंमत, परकीय वित्त संस्थांचे धोरण, पेट्रोलच्या किमती आणि जगभरातील शेअर बाजारांमधील वातावरण हे घटकही बाजारावर परिणाम करू शकतात. गत सप्ताहात भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणानंतर बाजारात उत्साह होता. वित्तीय संस्था, वाहन, फार्मा या कंपन्यांचे समभाग तेजीत असल्याचे बघावयास मिळाले. सेन्सेक्स ८४१.४५ अंशांनी वाढून ५९,८३२.९७ अंशांवर बंद झाला. निफ्टीनेही २३९.४० अंशांची वाढ दिली असून तो १७,५९९.१५ अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या दोन्ही क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाढ झाली आहे. आगामी सप्ताहात प्रमुख  माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत. सध्या मंदीमध्ये असलेल्या या क्षेत्रातील कंपन्यांची कामगिरी कशी राहणार याबाबत गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता आहे. देशातील चलनवाढीची आकडेवारीही जाहीर होणार असून तिचाही  बाजारावर मोठा परिणाम होऊ शकतो. परकीय वित्तसंस्थांच्या धाेरणावरही लक्ष असेल. 

परकीय संस्थांनी काढले ३७ हजार काेटी रुपये  भारतीय बाजारातून पैसे काढून घेण्याचे परकीय वित्तसंस्थांचे धोरण नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षातही कायम होते. या संस्थांनी गेल्या आर्थिक वर्षात ३७,६३१ कोटी रुपयांची रक्कम बाजारातून काढून घेतली आहे. याआधी २०२१-२२ या वर्षामध्ये परकीय वित्तसंस्थांनी भारतीय बाजारामधून आतापर्यंतची सर्वाधिक रक्कम काढली हाेती. 

टॅग्स :शेअर बाजार