Join us

शेअर बाजारात तासाभरात ५.४० लाख कोटींचा फटका, काय आहेत या पॅनिक सेलिंगमागची कारणं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 14:48 IST

Share Market News: मंगळवारी ओपनिंग बेलनंतर अवघ्या एका तासात बाजारात इतकी घसरण झाली की, बीएसईमध्ये लिस्टेड कंपनीचं मार्केट कॅप ५.४० लाख कोटी रुपयांनी घसरलं. मंगळवारी शेअर बाजार जोरदार आपटला.

Share Market News: शेअर बाजारात मंगळवारी वरच्या पातळीवरून जोरदार विक्री झाली आणि निफ्टी दिवसाच्या उच्चांकी पातळीपासून अवघ्या एका तासात ३०० अंकांनी घसरला. सकाळी ९.१५ नंतर निफ्टी २३४२६ च्या उच्चांकी पातळीवर होता, परंतु १०.१५ पर्यंत तो २३१२७ च्या दिवसाच्या नीचांकी पातळीवर आला. मंगळवारी ओपनिंग बेलनंतर अवघ्या एका तासात बाजारात इतकी घसरण झाली की, बीएसईमध्ये लिस्टेड कंपनीचं मार्केट कॅप ५.४० लाख कोटी रुपयांनी घसरलं.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारताच शेजारी देशांवर व्यापार शुल्क लादण्याची घोषणा केल्यानंतर शेअर बाजार सावध झाला, ज्याचा परिणाम बाजाराच्या कलावर झाला आणि गुंतवणूकदारांमध्ये पॅनिक सेलिंग दिसून आली. कामकाजादरम्यान बीएसईवरील सर्व लिस्टेड कंपन्यांचं बाजार भांडवल ५.२० लाख कोटी रुपयांनी घटून ४२६.३८ लाख कोटी रुपयांवर आले आहे. पाहूया घसरणीची काय आहेत कारणं?

शुल्कवाढीबाबत ट्रम्प यांची भूमिका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार शुल्काबाबत घेतलेल्या अनपेक्षित भूमिकेनंतर बाजार सावध झाला असून संभाव्य धोरणात्मक बदलांची चिंता गुंतवणूकदारांना सतावत आहे. शेजारी देशांवर शुल्क लादण्याबाबत त्यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यामुळे जागतिक बाजारपेठेतील कल अस्थिर झाला.ट्रम्प प्रशासन १ फेब्रुवारीपासून मेक्सिको आणि कॅनडावर २५ टक्के शुल्क लावण्याच्या विचारात आहे. या अनिश्चिततेमुळे महागाईचा दबाव, संभाव्य डॉलर मजबुती, ज्याचा बॉन्ड यील्डवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, याबद्दल चिंता वाढली आहे.

झोमॅटो, अन्य हेवीवेट कंपन्यांमध्ये घसरण

सेन्सेक्सच्या घसरणीत केवळ झोमॅटोच्या शेअरनं १७० अंकांचा वाटा उचलला. डिसेंबर तिमाहीत झोमॅटोच्या निव्वळ नफ्यात ५७ टक्क्यांनी घट झाली आहे. रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि एसबीआय या सारख्या दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समुळे सेन्सेक्समध्ये ३११ अंकांनी घसरण झाली.

कॉर्पोरेट अर्निंगमध्ये मंदीचं वातावरण

आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या तिसऱ्या तिमाहीच्या आर्थिक निकालांमध्ये अनेक कंपन्यांची कमकुवत कामगिरी कमी आहे. ब्लूमबर्गच्या तिसऱ्या तिमाहीच्या कमाईच्या अंदाजानुसार, निफ्टी ५० कंपन्यांच्या ईपीएसमध्ये वार्षिक आधारावर केवळ ३% वाढ होईल.

रियल्टी, कन्झुमर ड्युरेबल स्टॉक्समध्ये घसरण

डिक्सन टेक्नॉलॉजीज आणि अंबर एंटरप्रायझेसमुळे निफ्टी कन्झ्युमर ड्युरेबल्स निर्देशांक ३.२ टक्क्यांनी घसरला. तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर डिक्सन टेक्नॉलॉजीजचा शेअर १३ टक्क्यांहून अधिक घसरला. उत्पन्नात वाढ झाल्याचं सांगत जेफरीजनं आपले 'अंडरपरफॉर्म' रेटिंग आणि टार्गेट प्राइस १२,६०० रुपये कायम ठेवली, परंतु आर्थिक वर्ष २०२६ च्या उच्च पी/ईमुळे रिस्क रिवॉर्ड वाढण्याची भीती व्यक्त केली. दरम्यान, ओबेरॉय रियल्टी आणि लोढा यांच्या घसरणीमुळे निफ्टी रियल्टी निर्देशांक जवळपास ३ टक्क्यांनी घसरला. २० जानेवारी २०२५ पर्यंत एफआयआयनं ४८,०२३ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आहे.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक