Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीच्या नफ्यात ४५% वाढ; दक्षिण आफ्रिकेतून ₹४,०४५ कोटींची ऑर्डर मिळताच 'हा' शेअर सुस्साट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 15:25 IST

Texmaco Rail & Engineering : तगडे तिमाही निकाल अन् ४,०४५ कोटींच्या ऑर्डरमुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला.

Texmaco Rail & Engineering : रेल्वे आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील आघाडीची कंपनी टेक्समॅको रेल अँड इंजीनियरिंगच्या शेअरमध्ये बुधवारी मोठी तेजी पाहायला मिळाली. कंपनीचा शेअर इंट्रा-डे ट्रेडिंगदरम्यान तब्बल १३ ते १५ टक्क्यांनी वधारत १२० रुपयांच्या आसपास पोहोचला. या जोरदार वाढीमागे दोन मोठी कारणे असल्याचे मानले जात आहे. मार्च तिमाहीतील दमदार आर्थिक निकाल आणि दक्षिण आफ्रिकेतून मिळालेली ४,०४५ कोटी रुपयांहून अधिक किमतीची मोठी ऑर्डर.

चौथ्या तिमाहीत नफ्यात ४५% वाढ

वित्त वर्ष २०२५-२६ च्या चौथ्या तिमाहीत टेक्समॅको रेलने मजबूत आर्थिक कामगिरी नोंदवली आहे. कंपनीचा निव्वळ नफा ४५% वाढून ५७.७ कोटी रुपये झाला, जो मागील वर्षी याच तिमाहीत नफा ३९.८ कोटी रुपये होता. तर, कंपनीचे एकूण उत्पन्न १३% घसरून १,१६७ कोटी रुपयांवर आले. उत्पन्नात घट झाली असली तरी ऑपरेशनल पातळीवर कंपनीने चांगली कामगिरी केली.

याशिवाय, EBITDA (ऑपरेटिंग प्रॉफिट) ९% वाढून १०६.४ कोटी रुपये झाला, तर EBITDA मार्जिन ७.३% वरून ९.१% पर्यंत वाढले. यावरून कंपनीने खर्च नियंत्रण आणि नफा व्यवस्थापनावर मजबूत पकड मिळवली असल्याचे दिसून येते.

दक्षिण आफ्रिकेतून मिळाली मेगा ऑर्डर

कंपनीसाठी सर्वात मोठा सकारात्मक घटक म्हणजे दक्षिण आफ्रिकेतून मिळालेली मोठी रेल्वे ऑर्डर. या कराराअंतर्गत २,२३५ हून अधिक फ्रेट वॅगन पुरवठा आणि ३० डिझेल लोकोमोटिव्ह सप्लाय...अशाप्रकारे एकूण प्रकल्प मूल्य ४,०४५ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

विशेष म्हणजे या डीलमध्ये १५ वर्षांची लॉन्ग-टर्म मेंटेनन्स पार्टनरशिपही समाविष्ट आहे. त्यामुळे कंपनीला आगामी अनेक वर्षे नियमित महसूल मिळण्याची शक्यता आहे. कंपनीने या कराराला आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय रेल्वे संधींपैकी एक म्हटले आहे.

आफ्रिकन बाजारपेठेत विस्ताराची संधी

दक्षिण आफ्रिका सध्या रेल्वे आधुनिकीकरण, मायनिंग लॉजिस्टिक्स आणि फ्रेट मोबिलिटी क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत आहे. टेक्समॅको रेलला या प्रकल्पामुळे आफ्रिकेतील इतर देशांमध्येही नवीन व्यवसाय संधी मिळण्याची अपेक्षा आहे.

संरक्षण क्षेत्रातही एंट्रीची तयारी

कंपनी आता केवळ रेल्वे व्यवसायापुरती मर्यादित राहू इच्छित नाही. टेक्समॅको रेलने आपल्या उपकंपनी टेक्समॅको डिफेन्स डेक्नॉलॉजीमार्फत संरक्षण क्षेत्रात प्रवेश करण्याची योजना आखली आहे. पुढील ३ ते ५ वर्षांत कंपनी या व्यवसायात सुमारे २०० कोटी रुपयांची गुंतवणूक करू शकते. यामुळे कंपनीच्या व्यवसायात अधिक विविधता येण्याची शक्यता आहे.

शेअरमध्ये मोठी तेजी

बातमी करेपर्यंत कंपनीचा शेअर NSE वर १४.६४%, म्हणजेच १३.८५ रुपयांनी वाढून १२०.३५ रुपयांवर व्यवहार करत होता. दरम्यान, कंपनीच्या संचालक मंडळाने वित्त वर्ष २०२५-२६ साठी प्रति शेअर ०.७५ रुपयांच्या लाभांशाची शिफारस केली आहे.

(टीप- हा गुंतवणूकाचा सल्ला नाही. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

English
हिंदी सारांश
Web Title : Texmaco Rail Soars on Profit Jump, South Africa Order

Web Summary : Texmaco Rail's shares surged following a 45% profit increase and a ₹4,045 crore South African order for freight wagons and locomotives. The company also plans defense sector entry.
टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूक