Join us  

TATA च्या शेअरमध्ये तुफान तेजी, BMW सोबत मोठ्या डीलची घोषणा; पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2024 1:50 PM

एप्रिल रोजी टाटाच्या या कंपनीचे शेअर्स 7% पेक्षा जास्त वाढीसह 1126.80 रुपयांवर पोहोचले. पाहा काय आहे तेजीमागचं कारण.

टाटा समूहाची कंपनी टाटा टेक्नॉलॉजीजच्या शेअर्सनं रॉकेट स्पीड पकडला आहे. मंगळवार, 2 एप्रिल रोजी टाटा टेक्नॉलॉजीचे शेअर्स 7% पेक्षा जास्त वाढीसह 1126.80 रुपयांवर पोहोचले. कंपनीच्या शेअर्समध्ये ही मोठी वाढ एका मोठ्या घोषणेमुळे झाली आहे. टाटा टेक्नॉलॉजीजनं जर्मन लक्झरी ऑटोमोबाईल कंपनी BMW ग्रुपसोबत संयुक्त उपक्रमाची घोषणा केली आहे. हा संयुक्त उपक्रम जर्मन कंपनी BMW साठी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचं काम करणार आहे. 

टाटा टेक्नॉलॉजीजनं आपल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये यासंदर्भातील माहिती दिली आहे. संयुक्त उपक्रम ऑटोमेटेड ड्रायव्हिंगसाठी ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेअर आणि डॅशबोर्ड सिस्टम विकसित करण्यावर काम करेल. याशिवाय इतर फीचर्सही विकसित करणार आहेत. टाटा टेक्नॉलॉजीजनं या कराराचा आर्थिक तपशील अद्याप उघड केलेला नाही. टाटा टेक्नॉलॉजीज आणि बीएमडब्ल्यू ग्रुप या दोन्ही कंपन्यांचा संयुक्त उपक्रमात 50-50 टक्के हिस्सा असेल. टाटा टेक्नॉलॉजीज ऑटो, एअरो आणि हेवी मशिनरी उद्योगांना इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी सेवा पुरवते. 

500 रुपयांवर आलेला आयपीओ 

टाटा टेक्नॉलॉजीजचा (Tata Technologies) आयपीओ 475 ते 500 रुपयांच्या प्राइस बँडवर आला. कंपनीचा आयपीओ 22 नोव्हेंबर 2023 रोजी खुला झाला आणि तो 24 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार होता. आयपीओमध्ये कंपनीचे शेअर्स 500 रुपयांना अलॉट करण्यात आले होते. टाटा टेक्नॉलॉजीजचे शेअर्स 30 नोव्हेंबर 2023 रोजी बीएसईवर 1199.95 रुपयांवर लिस्ट झाले. लिस्टींगच्या दिवशी कंपनीचे शेअर 1400 रुपयांवर पोहोचले. टाटा टेक्नॉलॉजीजच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांकी  पातळी 1400 रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 1020 रुपये आहे. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :टाटाबीएमडब्ल्यूशेअर बाजार