Join us

टाटा ग्रुपचा शेअर सुसाट; पहिल्यांदाच स्टॉक स्प्लिट करणार, ₹८५०० पार पोहोचला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 13:08 IST

Tata Investment Corporation Stock Price: कंपनीच्या शेअर्समध्ये चांगलीच वाढ झाली आहे. बुधवारी बीएसईवर कंपनीचे शेअर्स जवळपास ५ टक्क्यांनी वाढून ८५४४ रुपयांवर पोहोचले.

Tata Investment Corporation Stock Price: टाटा समूहाची कंपनी टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे (Tata Investment Corporation) शेअर्स रॉकेट वेगानं वाढत आहेत. कंपनीच्या शेअर्समध्ये चांगलीच वाढ झाली आहे. बुधवारी बीएसईवर कंपनीचे शेअर्स जवळपास ५ टक्क्यांनी वाढून ८५४४ रुपयांवर पोहोचले. कंपनीच्या शेअर्सनं ५२ आठवड्यांची नवीन उच्चांकी पातळी गाठली आहे. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन आता आपल्या शेअर्सचं विभाजन करणार आहे. कंपनी १:१० या प्रमाणात शेअर्सचं विभाजन करणार आहे. लिक्विडिटी सुधारण्यासाठी आणि सामान्य गुंतवणूकदारांचा सहभाग वाढवण्यासाठी कंपनी हे पाऊल उचलत आहे.

पहिल्यांदाच शेअर्सचं विभाजन करणार

टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन पहिल्यांदाच आपल्या शेअर्सचं विभाजन करत आहे. टाटा समूहाची ही कंपनी आपला एक शेअर १० तुकड्यांमध्ये विभागणार आहे. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनने २२ सप्टेंबर रोजी नियामक फाइलिंगमध्ये सांगितलं की, भागधारकांनी शेअर्सच्या विभाजनाला मंजुरी दिली आहे. कंपनी १० रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या आपल्या एका शेअरचं रूपांतर १ रुपया फेस व्हॅल्यू असलेल्या १० शेअर्समध्ये करेल. कंपनीच्या संचालक मंडळानं ४ ऑगस्ट २०२५ रोजीच स्टॉक स्प्लिटच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.

सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी

बोनस शेअर्सही दिलेत

टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनमध्ये दीर्घ कालावधीनंतर मोठा कॉर्पोरेट ॲक्शन दिसून येत आहे. कंपनीनं दोन दशकांपूर्वी बोनस शेअर्स जारी केले होते. ऑगस्ट २००५ मध्ये कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना १:२ या प्रमाणात बोनस शेअर्स दिले होते. बोनस शेअरसाठी रेकॉर्ड डेट २३ ऑगस्ट २००५ होती.

५ वर्षांत ९००% पेक्षा जास्त वाढ

टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये गेल्या पाच वर्षांत ९०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. टाटा समूहाच्या या कंपनीचे शेअर्स २५ सप्टेंबर २०२० रोजी ८३०.५० रुपये होते. २४ सप्टेंबर २०२५ रोजी हे शेअर्स ८५४४ रुपयांवर पोहोचले आहेत. चार वर्षांत टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये ५५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या तीन वर्षांत शेअर्समध्ये २५० टक्क्यांहून अधिक, तर दोन वर्षांत २०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ८५४४ रुपये आहे, तर ५२ आठवड्यांचा नीचांक ५१४७.१५ रुपये आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारटाटागुंतवणूक