TCS Share Price: गुरुवारी टाटा समूहाची आयटी कंपनी टीसीएसनं बाजार बंद झाल्यानंतर तिमाही निकाल जाहीर केले. वार्षिक आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात १२ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. दरम्यान, कंपनी प्रति शेअर ७६ रुपये लाभांशही देत आहे. या दोन मोठ्या घोषणांचा परिणाम टीसीएसच्या शेअर्सवर दिसून आला आहे.
आज कामकाजादरम्यान टीसीएसचा शेअर ४२०० रुपयांच्या पातळीवर उघडला. सकाळी ९ वाजून ३२ मिनिटांनी कंपनीच्या शेअर्सनं ४२२७.७० टक्क्यांचा उच्चांक गाठला. गुरुवारच्या बंदच्या तुलनेत टीसीएसच्या शेअरमध्ये ४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.टाटा समूहाच्या कंपनीनं प्रति शेअर ७६ रुपये लाभांश जाहीर केला आहे. यात ६६ रुपयांच्या विशेष लाभांशाचाही समावेश आहे. कंपनी १७ जानेवारीला शेअर बाजारात एक्स-डिव्हिडंड स्टॉक म्हणून व्यवहार करणार आहे.
तिसऱ्या तिमाहीचे निकाल उत्तम
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा (टीसीएस) निव्वळ नफा ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत ११.९५ टक्क्यांनी वाढून १२,३८० कोटी रुपये झाला आहे. मात्र, या कालावधीत कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत पाच हजारांहून अधिक घट झाली आहे.
मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत (२०२३-२४) कंपनीला ११,०५८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. तर जुलै-सप्टेंबर २०२४ मध्ये कंपनीचा निव्वळ नफा ११,९०९ कोटी रुपये होता.
या तिमाहीत टाटा समूहाच्या कंपनीचा महसूल ५.६ टक्क्यांनी वाढून ६३,९७३ कोटी रुपये झाला आहे, जो २०२३-२४ च्या याच तिमाहीत ६०,५८३ कोटी रुपये होता. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत तो ६४,२५९ कोटी रुपये होता. या तिमाहीत कंपनीची नवीन ऑर्डर बुकिंग १०.२ अब्ज डॉलर होती.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)