Stock Markets Today: देशांतर्गत शेअर बाजार आज तेजीसह उघडले. सेन्सेक्स २३७ अंकांनी वधारून ७६,१३८ वर उघडला. निफ्टी ६९ अंकांनी वधारून २३,०२६ वर आणि बँक निफ्टी १३१ अंकांनी वधारून ४८,९९७ वर उघडला. करन्सी मार्केटमध्ये रुपया ६ पैशांनी घसरून ८६.५८/डॉलरवर पोहोचला. ओपनिंगमध्ये आयटी आणि ऑटो निर्देशांकांनी शेअर बाजारात सर्वाधिक वाढ नोंदवली. एफएमसीजी आणि रियल्टी निर्देशांकात घसरण दिसून आली.
बजाज ऑटो, इन्फोसिस, विप्रो, सिप्ला, टेक महिंद्रा या शेअरमध्ये निफ्टीवर तेजी होती. एचडीएफसी लाइफ, एसबीआय लाइफ, जेएसडब्ल्यू स्टील, एसबीआय, मारुती यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली होती.
जागतिक बाजारातून चांगली चिन्हं दिसत आहेत. प्री-ओपनिंगमध्ये मार्केट ग्रोथपासून सुरुवात होण्याची चिन्हं होती. सकाळी गिफ्ट निफ्टी २३००० च्या वर ५० अंकांनी वधारला होता आणि डाऊ फ्युचर्स सुस्त दिसत होते. निक्केई जवळपास २०० अंकांनी वधारला. कालच्या तेजीमध्ये देशांतर्गत फंडांनी ६८०० कोटी रुपयांची मोठी खरेदी केली, तर एफआयआयनं ५४०० कोटी रुपयांच्या रोख आणि इंडेक्स फ्युचर्सच्या विक्रीसह निव्वळ २९०० कोटी रुपयांची विक्री केली.
तिमाही निकाल
बजाज ऑटो, भेल, कोलगेट, जीएमआर आणि एक्साइडचे निकाल अपेक्षेप्रमाणे होते, तर एसबीआय कार्ड, एमजीएल, जेएसडब्ल्यू एनर्जी आणि बॉशचे निकाल निराशाजनक होते. आज बजाज फायनान्स, मारुती आणि टाटा मोटर्सचे निकाल जाहीर होणार आहेत. एफ अँड ओमध्ये अंबुजा सिमेंट, सीएएमएस, इंडियन बँक आणि व्होल्टास सह ७ निकालांवर बाजाराचं लक्ष असेल.