Stock Markets Today: देशांतर्गत शेअर बाजारासाठी विकली एक्सपायरीच्या दिवशी गुरुवारी निफ्टी ग्रीन झोनमध्ये उघडला. सुरुवातीला सेन्सेक्स जवळपास २०० अंकांच्या वाढीसह ७८,४६३ वर व्यवहार करत होता. निफ्टी ५० जवळपास ५० अंकांच्या वाढीसह २३,७३७ च्या पातळीवर व्यवहार करत होता. बँक निफ्टी सुमारे ६० अंकांच्या वाढीसह ५०,४०० च्या पातळीवर व्यवहार करत होता. निफ्टी मिडकॅप २०० अंकांनी वधारला. तर स्मॉलकॅप निर्देशांक ४० अंकांनी वधारला. मात्र त्यानंतर सेन्सेक्स-निफ्टी फ्लॅट व्यवहार करताना दिसले आणि निफ्टी २३,७०० च्या खाली घसरताना दिसला.
आयटी, फार्मा आणि पीएसयू शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर एफएमसीजी शेअर्स आजही काहीसे कमकुवत राहिले. निफ्टीवर पॉवर ग्रिड, बीपीसीएल, डॉ. रेड्डी, सन फार्मा, इन्फोसिस या कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले. श्रीराम फायनान्स, टायटन, आयटीसी, अपोलो हॉस्पिटल, टाटा स्टील यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले.
जागतिक बाजारातून उत्तम संकेत
जागतिक बाजारातून चांगले संकेत मिळाले. अमेरिकेचे बाजार सलग दुसऱ्या दिवशी तेजीसह दिवसभरातील उच्चांकी पातळीवर बंद झाले. डाऊ सुमारे साडेतीनशे अंकांनी वधारला, तर नॅसडॅक ५० अंकांनी वधारला. गिफ्ट निफ्टी ३० अंकांच्या किरकोळ वाढीसह २३८०० च्या जवळ होता. डाऊ फ्युचर्स ५० अंकांनी तर निक्केई २०० अंकांनी वधारले.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यानं २९०० डॉलरच्या वर नवा विक्रम प्रस्थापित केला. देशांतर्गत बाजारात पहिल्यांदाच सोन्याचा भाव ८४,९०० वर पोहोचला. कच्च्या तेलाचा भाव २ टक्क्यांनी घसरून ७५ डॉलरच्या खाली वर्षातील नीचांकी पातळीवर आला आहे.