Share Market Today : देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात मंगळवारी (२१ जानेवारी) तेजीने झाली. मात्र, सुरुवातीच्या व्यवहारात बेंचमार्क निर्देशांक हळूहळू वरच्या पातळीच्या खाली घसरताना दिसले. सेन्सेक्स १११ अंकांच्या तेजीसह उघडला, मात्र त्यानंतर त्यात घसरण झाली. निफ्टी जवळपास ५० अंकांच्या वाढीसह २३,४०० च्या पातळीजवळ होता. बँक निफ्टी ४९,४५८ च्या आसपास फ्लॅट होता. निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही काहीसे मंदावले.
कामकाजादरम्यान, अपोलो हॉस्पिटल, अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा, बीपीसीएल, हिंडाल्को या शेअरमध्ये निफ्टीवर चांगली तेजी होती. तर ओएनजीसी, ट्रेंट, एनटीपीसी, एसबीआय लाइफ, कोटक बँक यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले. ओपनिंगमध्ये सेन्सेक्स मागील बंदच्या तुलनेत १८८ अंकांनी वधारून ७७,२६१ च्या पातळीवर उघडला. निफ्टी ७७ अंकांनी वधारून २३,४२१ वर तर बँक निफ्टी १८२ अंकांनी वधारून ४९,५३२ वर बंद झाला.
सकाळी गिफ्ट निफ्टीमध्ये किंचित वाढ झाली आणि निर्देशांक २३,४२३ च्या आसपास व्यवहार करत होता. प्री-ओपनिंगमध्ये सेन्सेक्स-निफ्टी चांगल्या तेजीसह उघडण्याची चिन्हे होती. जागतिक बाजारात आज किंचित सुस्ती दिसून आली.
काल अमेरिकन बाजारात सुट्टी नंतर आज डाऊ फ्युचर्स मंदावले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी काल अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. आपल्या पहिल्या शपथविधी भाषणात त्यांनी अमेरिकेचं नवं सुवर्णयुग सुरू होत असल्याचं म्हटलं. कठोर इमिग्रेशन धोरण, हाय टॅरिफ आणि महागाई कमी करण्याच्या आश्वासनाचा त्यांनी पुनरुच्चार केला. आशियाई बाजारातही निक्केई फ्लॅट होता.