Join us

आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी बाजारात उसळी; JSW, अदानी, महिंद्रासह या शेअर्समध्ये वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 16:08 IST

Stock Market Updates: सप्टेंबरच्या तिमाहीत जीडीपी वाढ जवळपास २ वर्षांतील नीचांकी पातळीवर गेली आहे. या निकालाचा परिणाम आज शेअर बाजारातही पाहायला मिळाला.

Stock Market Updates : देशांतर्गत शेअर बाजारात सोमवारी (२ डिसेंबर) आठवड्याची सुरुवात लाल रंगात झाली आहे. सुरवातीला सेन्सेक्स ३०० अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. निफ्टी ८० अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. बँक निफ्टीही १६० अंकांनी घसरला. मिडकॅप निर्देशांकातही घसरण दिसून आली. मात्र, नंतर बाजारात चांगली वाढ नोंदवण्यात आली. कमकुवत सुरुवातीनंतर, बाजाराने शेवटच्या काही तासांत पुन्हा वेग पकडला. ज्यामुळे बीएसई सेन्सेक्स ४४५.२९ अंकांनी वाढून ८०,२४८.०८ वर बंद झाला.

अशाप्रकारे सेन्सेक्सने पुन्हा एकदा 80 हजारांची पातळी ओलांडली. निफ्टीमध्येही आज चांगली वाढ नोंदवण्यात आली. निफ्टी ५० ने १४६.१५ अंकांची वाढ नोंदवली. निफ्टी २४,२७७.२५ वर बंद झाला. अल्ट्राटेक सिमेंट, जेएसडब्ल्यू, अदानी पोर्ट्स, टेक महिंद्रा, महिंद्रा, मारुती, टाटा इत्यादी सेन्सेक्स समभागांनी चांगला नफा नोंदवला.

जीडीपीचा परिणाम बाजारावरदेशांतर्गत शेअर बाजार सेन्सेक्स आणि निफ्टीने सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात घसरण नोंदवली. परकीय गुंतवणूकदार सातत्याने पैसे काढून घेत असल्याने बाजारावर परिणाम झाला. BSE सेन्सेक्स सुरुवातीच्या व्यवहारात ४९३.८४ अंकांनी घसरला आणि ७९,३०८.९५ अंकांवर पोहोचला होता. NSE निफ्टी १२२.४५ अंकांनी घसरून २४,००८.६५ वर पोहोचला. निराशाजनक आर्थिक आकडेवारीचाही बाजारावर परिणाम झाला. शुक्रवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, उत्पादन आणि खाण क्षेत्राची खराब कामगिरी आणि कमकुवत उपभोग यामुळे भारताचा आर्थिक विकास दर चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत ५.४ टक्क्यांवर जवळपास २ वर्षांतील नीचांकी पातळीवर घसरला.

ट्रम्प यांचा ब्रिक्स देशांना इशाराअमेरिकेचे येणारे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांना इशारा दिला आहे. जर त्यांनी डॉलरच्या जागी ब्रिक्स चलन किंवा इतर कोणतेही चलन आणले तर त्यांच्यावर १०० टक्के शुल्क लागू केले जाईल, असे ट्रम्प म्हणाले. त्याचवेळी युक्रेनने रशियासोबतचे युद्ध संपवण्याचे मान्य केले आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की युक्रेनला नाटो संरक्षण मिळाल्यास ते युद्धविराम घेतील.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक