Stock Market Today: आज देशांतर्गत शेअर बाजारात निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. कामकाजादरम्यान शेअर बाजाराची सुरुवात तेजीनं झाली. सुरुवातीच्या काळात सेन्सेक्स १०३ अंकांनी वाढून ८०,६४३ च्या आसपास व्यवहार करत होता. निफ्टी ३३ अंकांनी वाढून २४,६३५ च्या वर होता. बँक निफ्टी २४ अंकांनी वाढून ५५,२०५ च्या आसपास व्यवहार करत होता. निफ्टी मिडकॅपमध्येही सुमारे १९० अंकांनी वाढ झाली. आयटी आणि फार्मा समभाग निफ्टीवर सर्वात जास्त वाढले. काही काळानंतर बाजार वरच्या पातळीवरून घसरला आणि फ्लॅट व्यवहार करताना दिसला.
स्वातंत्र्यदिनानिमित्त उद्या बाजार बंद राहणार असल्यानं या आठवड्यातील हे शेवटचं ट्रेडिंग सत्र आहे. या निमित्तानं जागतिक बाजारपेठेतून संमिश्र संकेत मिळत आहेत. काल अमेरिकन बाजारपेठेत पुन्हा एकदा नवीन उच्चांक नोंदवण्यात आले. दर कपातीच्या अपेक्षेने, अमेरिकन बाजारपेठांनी काल पुन्हा नवीन विक्रम केले. नॅस्डॅक सलग चौथ्या दिवशी आणि एस अँड पी दुसऱ्या दिवशी आजवरच्या उच्चांकावर होता. डाऊनं ४५० अंकांनी वाढ करून ३ आठवड्यांचा उच्चांक गाठला. आज सकाळी गिफ्ट निफ्टी २५ अंकांच्या घसरणीसह २४७०० च्या खाली होता. डाऊ फ्युचर्स स्थिर होते.
कच्च्या तेलाचे दर नीचांकी पातळीवर
कमोडिटी मार्केटमध्ये, कच्च्या तेलाचा भाव १० आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर होता जो ६६ डॉलर्सपेक्षा कमी होता. दरम्यान, क्रिप्टो मार्केटमध्ये, बिटकॉइननं १,२४,००० डॉलर्सच्या वरचा विक्रमी उच्चांक गाठला. इतर क्रिप्टो चलनांमध्येही ४ ते ६% वाढ झाली.