Stock Market Today : देशांतर्गत शेअर बाजारात शुक्रवारी (३१ जानेवारी) तेजीसह सुरुवात झाली आहे. सेन्सेक्स १२९ अंकांनी वधारून ७६,८८८ वर उघडला. निफ्टी ४७ अंकांनी वधारून २३,२९६ वर उघडला. बँक निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह ४९,२५९ वर आणि चलन बाजारात रुपया २ पैशांनी घसरून ८६.६४/ डॉलरवर उघडला. आयटी आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स निर्देशांकात तेजी होती. रियल्टी, मेटल आणि पीएसयू बँक या निर्देशांकात घसरण झाली.
निफ्टीवर एलटी, टाटा कन्झ्युमर, टायटन, विप्रो, बीईएलमध्ये चांगली तेजी होती. तर आयटीसी हॉटेल्स, बजाज फिनसर्व्ह, अदानी एंटरप्रायजेस, भारती एअरटेल, कोल इंडिया मध्ये घसरण झाली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज २०१९-२० चा आर्थिक पाहणी अहवाल सादर करणार आहेत. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सकाळी ११ वाजता राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं सुरुवात होणार आहे.
आज जागतिक बाजारातून सकारात्मक चिन्ह दिसून येत आहेत. गिफ्ट निफ्टी २३,४२५ च्या आसपास सपाट व्यवहार करत होता. अमेरिकेच्या फ्युचर्समध्ये तेजी होती. काल अमेरिकन बाजार अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर तेजीसह बंद झाले. डाऊ जवळपास २०० अंकांनी वधारून दोन महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला, तर नॅसडॅक ५० अंकांनी वधारला. चौथ्या तिमाहीत अमेरिकेचा आर्थिक विकास दर अपेक्षेपेक्षा मंदावला आहे. अमेरिकेचा जीडीपी विकास दर २.३ टक्के होता.
सोन्यात तेजी
कमॉडिटी मार्केटबद्दल बोलायचं झालं तर सोनं ७० डॉलरनं वाढून २८५० डॉलरच्यावर पोहोचलं तर देशांतर्गत बाजारातही सोनं १२०० रुपयांनी वधारून ८२,१०० च्या उच्चांकी पातळीवर पोहोचलं. चांदी ४ टक्क्यांनी वधारली तर कच्च्या तेलाची किंमत ७६ डॉलरच्या वर गेली.