Share Market Today: इस्रायल आणि इराणमधील लष्करी संघर्ष आणि जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी देशांतर्गत शेअर बाजार तेजीसह उघडला. १६ जून रोजी सकाळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५८.२० अंकांच्या वाढीसह ८१,१७६.८० वर व्यवहार करत होता. त्यानंतर त्यात आणखी तेजी दिसून आली. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही २३.३० अंकांनी वधारून २४,७४१.९० अंकांवर खुला झाला.
या शेअर्समध्ये घसरण / तेजी
निफ्टीवर सिप्ला, एल अँड टी, श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स आणि एशियन पेंट्स यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले, तर डॉ. रेड्डीज लॅब्स, कोटक महिंद्रा बँक, जिओ फायनान्शिअल आणि अॅक्सिस बँक यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. सत्राच्या सुरुवातीच्या टप्प्यात पीएसयू बँक वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक ग्रीन झोनमध्ये आहेत. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक फ्लॅट व्यवहार करत आहेत.
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
चौथ्या दिवशीही संघर्ष सुरुच
इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेला संघर्ष चौथ्या दिवशीही थांबलेला नाही. इस्रायलच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इराणच्या गुप्तचर प्रमुखांसह २२४ जण ठार झाल्याची माहिती आहे. या वाढत्या तणावामुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. यावर प्रतिक्रिया देताना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देश आता कराराच्या दिशेने वाटचाल करतील, अशी आशा व्यक्त केली आहे. इस्रायल आणि इराणनं आपापसात करार करण्याची वेळ आली आहे जेणेकरून संघर्ष संपुष्टात येईल, असंही ते म्हणाले.
मध्यपूर्वेतील या वाढत्या तणावाचा परिणाम जागतिक बाजारपेठेवरही स्पष्टपणे दिसून आला. शुक्रवारी अमेरिकेच्या शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. डाऊ जोन्स ७७० अंकांनी घसरून बंद झाला, तर टेक कंपन्यांनी भरलेला नॅसडॅक निर्देशांकही २५० अंकांनी घसरून दिवसाच्या नीचांकी पातळीवर बंद झाला.