Join us

सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २४४ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 09:57 IST

Share Market Update: सलग दुसऱ्या दिवशी बाजारात घसरण झाली. सेन्सेक्स २६९ अंकांनी घसरून ८१,३१४ वर उघडला. निफ्टी ६५ अंकांनी घसरून २४,७८८ वर उघडला.

Share Market Update: सलग दुसऱ्या दिवशी बाजारात घसरण झाली. सेन्सेक्स २६९ अंकांनी घसरून ८१,३१४ वर उघडला. निफ्टी ६५ अंकांनी घसरून २४,७८८ वर उघडला. बँक निफ्टी १७० अंकांनी घसरून ५५,५४४ वर आला. रुपया ८६.२४ च्या तुलनेत ८६.३६/डॉलरवर उघडला. क्षेत्रीय निर्देशांकांबद्दल बोलायचं झालं तर, आज फक्त आयटी, रिअल्टी आणि धातूच्या शेअर्समध्ये थोडीशी वाढ दिसून आली. याशिवाय, फार्मा, पीएसयू बँका आणि ऑटो क्षेत्रात विक्री दिसून येत आहे. एफएमसीजी देखील घसरणीसह उघडला.

आज कामकाजादरम्यान इंडसइंड बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती, टायटन आणि टेक महिंद्रा या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर अॅक्सिस बँक, अदानी पोर्ट्स, एनटीपीसी, पॉवरग्रीड आणि कोटक बँकेच्या शेअरमध्ये आज घसरण झाली.

२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून करावी लागेल गुंतवणूक?

या वृत्तानं दिलं टेन्शन

मध्य पूर्वेतील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला गंभीर इशारा दिला आहे. इराणनं बिनशर्त सरंडर करावं अन्यथा त्यांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल, असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय. इराणचे सर्वोच्च नेते कुठे लपले आहेत हे त्यांना माहिती आहे, परंतु ते सध्या त्यांच्यावर हल्ला करणार नाहीत, असंही त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, इस्रायलनं सलग सहाव्या दिवशीही इराणवर हल्ले सुरू ठेवले आहेत. प्रत्युत्तरादाखल इराणनं इस्रायली गुप्तचर संस्था मोसादच्या मुख्यालयावर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा केला आहे. तथापि, आंतरराष्ट्रीय स्तरावर या दाव्याची पुष्टी झालेली नाही.

जागतिक बाजारपेठेवरही परिणाम

या संपूर्ण घटनेचा परिणाम जागतिक बाजारपेठेवरही दिसून येत आहे. इराणवर अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्याच्या भीतीमुळे ब्रेंट क्रूडच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती सुमारे ४ टक्क्यांनी वाढून ७६ डॉलर प्रति बॅरलच्या वर गेल्या आहेत.

मध्य पूर्वेतील तणावामुळे अमेरिकन शेअर बाजारांनाही धक्का बसला आहे. डाउ जोन्स ३०० अंकांनी घसरला तर नॅसडॅक निर्देशांक १८० अंकांनी घसरला. भारताचा गिफ्ट निफ्टी देखील ५० अंकांनी घसरून २४,८३५ वर पोहोचला. परंतु, डाउ फ्युचर्समध्ये किंचित वाढ झाली आहे आणि जपानचा निक्केई १७५ अंकांनी वधारला.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक