Join us

डोनाल्ड ट्रम्प यांचं एक वक्तव्य आणि जगभरातील शेअर बाजार धडाम! नेमकं काय म्हणाले राष्ट्राध्यक्ष?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 13:47 IST

Stock Market Crash: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका वक्तव्यामुळे जगभरातील शेअर बाजार कोसळले आहेत. यात भारतही सूटला नाही.

Stock Market Crash : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या सत्तेत आल्यापासून जागतिक अर्थव्यवस्थेची घडी विस्कटत असल्याचे पाहायला मिळत आहे. ट्रम्प यांची आक्रमक धोरणे, रेसिप्रोकल टॅरिफ याचा थेट परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. मंगळवारचा दिवस संपूर्ण जगाच्या शेअर बाजारांसाठी चांगला नव्हता. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे अमेरिका आणि आशियातील शेअर बाजार कोसळल्याचे मानले जात आहे. या विधानानंतर एकीकडे अमेरिकेचा डाऊ ९०० अंकांनी घसरला असून ४ महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचला, तर दुसरीकडे नॅस्डॅकमध्ये अडीच वर्षांतील सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली. यातून भारतीय शेअर बाजारही सुटला आहे.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?अमेरिकेतील प्रसिद्ध टेलिव्हिजन शो 'संडे मॉर्निंग फ्यूचर्स विथ मारिया बार्टिरोमो' मध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सहभागी झाले होते. यावेळी बोलताना ट्रम्प यांनी यूएस अर्थव्यवस्थेवर भाष्य केलं. ट्रम्प म्हणाले, की अमेरिकेची अर्थव्यवस्था संक्रमणातून जाण्याची शक्यता असून मंदीची शक्यता नाकारता येत नाही. एका मुलाखतीत ट्रम्प यांना या वर्षी मंदीची अपेक्षा आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. याला ट्रम्प यांनी उत्तर दिले, "मला अशा गोष्टींचा अंदाज वर्तवायला आवडत नाही. परंतु, आम्ही जे करत आहोत ते खूप मोठे आहे, त्यामुळे हा संक्रमणाचा काळ आहे." या वक्तव्यानंतर गुंतवणूकदार चिंतीत झाल्याने त्याचे पडसाद शेअर बाजारात पाहायला मिळाले.

या समभागांमध्ये मोठी घसरणजगभरातील शेअर बाजारातील घसरणीमुळे सेन्सेक्समधील ३० पैकी २१ समभाग घसरणीसह व्यवहार करत आहेत. तर निफ्टीच्या ५० समभागांपैकी ३३ समभाग घसरणीसह व्यवहार करत होते. घसरलेल्या समभागांमध्ये इंडसइंड बँक १५ टक्के, इन्फोसिस ३.१४ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा ३.०३ टक्के, झोमॅटो २.१३ टक्के, बजाज फिनसर्व्ह १.६२ टक्के, टेक महिंद्रा १.०७ टक्के घसरणीसह व्यवहार करत आहे.

कोट्यवधी रुपयांचे नुकसानभारतीय शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे ३ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बातमी लिहीत असताना बीएसई वर सूचीबद्ध समभागांचे मार्केट कॅप ३९०.९१ लाख कोटी रुपयांवर घसरले आहे, जे गेल्या ट्रेडिंग सत्रात ३९३.८५ लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे २.९४ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :डोनाल्ड ट्रम्पशेअर बाजारशेअर बाजारनिर्देशांक