Stock Market Today: देशांतर्गत शेअर बाजारात सोमवारी झालेल्या प्रचंड घसरणीनंतर मंगळवारी जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत मिळाले. आज बाजाराची जोरदार सुरुवात झाली. सेन्सेक्समध्ये ३५० अंकांची तेजी पाहायला मिळत होती. त्यामुळे निफ्टीजवळपास १२० अंकांनी वधारला होता. बँक निफ्टी ४०० अंकांनी वधारला. बीईएल, एनटीपीसी, एसबीआय सारख्या सरकारी शेअर्समध्ये तेजी होती. इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक यांसारख्या शेअर्समध्ये तेजी होती.
लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सकाळी निफ्टी १२० अंकांनी वधारला. अमेरिकेच्या बाजारात सोमवारी मोठी सुधारणा दिसून आली. कालच्या घसरणीत देशांतर्गत फंडांकडून ८००० कोटी रुपयांहून अधिकची जोरदार खरेदी झाली, तर एफआयआयने कॅश, इंडेक्स आणि शेअर फ्युचर्स सह एकूण ४०६५ कोटी रुपयांची निव्वळ विक्री केली. त्याचवेळी भारतीय अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर एक-दोन चांगल्या बातम्या आल्या, ज्यामुळे आज चांगली तेजी अपेक्षित आहे.
डिसेंबरमधील किरकोळ महागाई चार महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. अन्नधान्य महागाई कमी झाल्याने सीपीआय साडेपाच टक्क्यांवरून ५.२२ टक्क्यांवर आला आहे. आर्थिक आघाडीवर आणखी एक मजबूत बातमी आहे. एप्रिलपासून निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन १६ टक्क्यांनी वाढून सुमारे १७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, तर एकूण संकलनात २० टक्क्यांची वाढ झालीये.
जागतिक बाजारातील अपडेट्स
सलग चौथ्या दिवशी घसरणीसह डाओ ३५० अंकांनी वधारला, तर नॅसडॅक २५० अंकांच्या रिकव्हरीनंतही सुमारे ७५ अंकांनी घसरला. गिफ्ट निफ्टी १२५ अंकांनी वधारून २३,३०० वर बंद झाला. डाओ फ्युचर्स ५० अंकांनी वधारले होते, तर कालच्या सुट्टीनंतर निक्केई ५०० अंकांनी घसरला होता.
सलग ४ दिवसांच्या तेजीनंतर सोनं ३५ डॉलरनं घसरून २६८५ डॉलरवर आलं, तर चांदी ३ टक्क्यांनी घसरून ३१ डॉलरवर आली. कच्च्या तेलाचा भाव ८१ डॉलरच्या जवळपास स्थिर होता. यासह एचसीएल टेकचा निकाल काल संमिश्र लागला. एंजल वनच्या वर्किंग प्रॉफिटमध्ये २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आज या निकालांसह शेअर्सकडे लक्ष असेल.