Share Market Today Updates: आज आठवड्यातील शेवटचं ट्रेडिंग सेशन असून तेजीसह खुला झाला. निफ्टी ६५ अंकांनी वधारून २३,०९६ वर, तर सेन्सेक्स २५० अंकांनी वधारून ७६,३८९ वर उघडला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्येही तेजी दिसून येत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी २३,१०० च्या वर ट्रेड करत होता. टाटा स्टील, विप्रो, हिंडाल्को या शेअर्समध्ये निफ्टीत तेजी दिसत असून ते सुमारे दीड टक्क्यांपर्यंत वधारले आहेत. तर, अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्स हे निफ्टीत सर्वाधिक घसरले आहेत.
एंजल वनचे टेक्निकल रिसर्च हेड समीत चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार, बाजारात तेजी येताना दिसत आहे. अनेक जागतिक घटक सकारात्मक आहेत. तांत्रिक आधारावर २२,९००-२२,८०० च्या रेंजमध्ये महत्त्वाचा सपोर्ट आहे, तर तात्काळ २३,२५०-२३,३५० च्या रेंजमध्ये रेझिस्टन्स आहे. या मार्केटमध्ये सावधगिरी बाळगणं अधिक गरजेचं आहे. अशा वेळी पोझिशन हलकी ठेवणं आवश्यक आहे.
२३,०३१ वर निफ्टी झालेला बंद
काल भारतीय बाजार फ्लॅट होता आणि निफ्टी किरकोळ घसरणीसह २३,०३१ वर बंद झाला. जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत येण्याची चिन्हं आहेत. सुरुवातीच्या व्यवहारात आशियाई बाजारात तेजी आहे. काल एफआयआयने कॅश मार्केटमध्ये २७८९ कोटी रुपयांची तर डीआयआयने २९३४ कोटी रुपयांची खरेदी केली. ट्रम्प यांनी शुल्क लावण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली असली तरी त्याची अंमलबजावणी अद्याप होणार नसल्यानं बाजाराला काहीसा दिलासा मिळाला आहे.